
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दजन्य परिस्थिती, विविध देशांवर लावण्यात आलेले निर्बंध, कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, खतांच्या आयाती बाबतीत जागतिक वाहतूकीसाठी येणार्या अडचणी यामुळे खरीप हंगाम 2022 मध्ये संभाव्य दरवाढ व खताची टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्यांनी संभाव्य दर वाढ व खताची टंचाई टाळण्यासाठी आवश्यक असणारी खते वेळेत खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने भात, बाजरी, तूर, मूग, उडिद, सोयाबिन, कापूस, मका इत्यादी पीके घेतली जातात. यासाठी जून महिन्यांमध्ये खताची आवश्यकता असते. आवश्यक खताच्या खरेदीसाठी शेतकरी मे महिन्यांमध्येच पूर्वनियोजन करत असतात. ही बाब लक्षात घेऊन या पूर्व नियोजनासाठी रब्बी हंगाममधला शिल्लक खत साठयाची आवश्यकता भासते. या शिल्लक खतसाठ्यामुळे खरीप हंगामामध्ये खत तुटवडा होत नाही. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 516.50 मिली मीटर इतके असून मागील वर्षी 670.40 मिली मीटर इतके पर्जन्यमान झाले होते.
खरीप हंगामासाठी असणारे सरासरी क्षेत्र 5 लाख 500 हजार 49 हेक्टर इतके असून मागील वर्षी 8 लाख 9 हजार 13 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याचप्रमाणे 1 लाख 85 हजार 25 मे. टन खताचा शेतकर्यांनी वापर केला होता. सद्यस्थितीत विचार केला असता, येणार्या खरीप हंगामासाठी 8 लाख 38 हजार 946 हेक्टर क्षेत्र पेरणीचे लक्षांक ठेवले असून त्याप्रमाणे 2 लाख 75 हजार 505 मेट्रीक टन खताची मागणी येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने युरीया 1 लाख 10 हजार 823 मेट्रीक टन, एमओपी 16 हजार 878 मेट्रीक टन, डीएपी 28 हजार 368 मेट्रीक टन, संयुक्त खते 84 हजार 35 मेट्रीक टन, एसएसपी 35 हजार 400 मेट्रीक टन खतांचा समावेश आहे.
रब्बी हंगामामधील शिल्लक खत साठा साधारणतः 62 हजार 599 मेट्रीक टन इतका आहे. खतांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.