वांबोरी परिसरातील विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला

सासरकडील तीनजण पोलिसांच्या ताब्यात
वांबोरी परिसरातील विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात काल दि. 15 डिसेंबर रोजी छाया भुसारे या विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या सासरकडील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या कुक्कडवेढे येथे काल दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी छाया शिवाजी भुसारे या 28 वर्षीय विवाहित तरुणीचा मृतदेह त्यांच्याच विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

मयत छाया हिचा अनेक महिन्यांपासून सासरचे लोक छळ करून पैशाची मागणी करत होते. माहेरहून पैसे आणावेत, म्हणून तिचा मोठ्या प्रमाणावर शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. सासरच्या त्रासाबाबत तिने माहेरच्या लोकांना सांगितले होते. काल तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या लोकांनी व्यक्त केला आहे. याबाबत पती शिवाजी आसाराम भुसारे, सासरा आसाराम मारूती भुसारे, सासू यमुनाबाई आसाराम भुसारे, नणंद गिताबाई रमेश पंडित या चार लोकांनी मयत छाया हिचा घातपात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

राहुरी पोलिसांनी शिवाजी भुसारे, आसाराम भुसारे, यमुनाबाई भुसारे या तिघाजणांना ताबडतोब ताब्यात घेतले आहे. पोलिसांत सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com