वांबोरीच्या भरचौकात लिंबू,नारळ टाकल्याने नागरिक भयभीत

वांबोरीच्या भरचौकात लिंबू,नारळ टाकल्याने नागरिक भयभीत

जादूटोणा की भानामती? यावर चर्चा सुरू

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील केएसबी चौकातील मुख्य रस्त्याच्या मधोमध गेल्या काही दिवसांपासून अचानक टाचण्या टोचलेले लिंबू व नारळ त्यावर हळद कुंकू यासह काही भानामतीच्या वस्तूंची पूजा अज्ञातांकडून केली जात आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून हा नेमका जादूटोणा की भानामती? याविषयी उलट-सुलट चर्चा होत असून याविषयी काही अनिष्ट गोष्टींची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे. अशी पूजा करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वांबोरी गाव हे पूर्वीपासूनच बाजारपेठेचे गाव आहे. येथे अनेक पुरातन वाडे व वास्तू आजही अस्तित्वात आहेत. पेशवेकाळात महाराष्ट्रातील महत्त्वाचे म्हणून वांबोरीकडे पाहिले जात आहे. अनेकवेळा येथे खोदाईमध्ये पुरातन भांडे व मूर्ती आढळल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे गुप्तधन शोधणार्‍यांसह मांत्रिक व भानामती जादूटोणा करणार्‍यांची वांबोरीकडे विशेष नजर असते. परंतु वांबोरीतील सुज्ञ नागरिकांच्या चाणाक्षतेमुळे या अगोदर असे प्रकार कधी घडलेले नाही.

मात्र, मागील काही दिवसांपासून वांबोरीतील महत्त्वाच्या केएसबी चौकाच्या मधोमध काही अज्ञातांकडून टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ त्यावर हळद कुंकू यासह आणखी काही विशिष्ट वेगळ्या वस्तूंचा उपयोग करून अघोरी पूजा मांडण्यात येते. असे प्रकार एकाच आठवड्यात दोनदा उघडकीस आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा काही भानामती किंवा जादूटोणा किंवा गुप्तधन शोधण्याचा प्रकार तर नाही ना? यासारख्या चर्चांना परिसरात एकच पेव फुटले असून यातून काही अनुचित प्रकार घडू नये तसेच कोणाचा यासाठी बळी जाऊ नये, यासाठी अशा महाभागांवर शोधून कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना मात्र, आजही जादूटोणा, भानामती यासारख्या अंधश्रद्धेवर नागरिक विश्वास ठेवून गावाच्या मुख्य रस्त्यावर अशी अघोरी पूजा करून संपूर्ण गावाला वेठीस धरणार्‍यांचा पोलिसांनी तात्काळ शोध घ्यावा. अन्यथा श्रीसंत सावता माळी युवक संघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीसंत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com