वांबोरी चारी टप्पा दोनसाठी लवकरच बैठक

वांबोरी चारी टप्पा दोनसाठी लवकरच बैठक

करंजी (वार्ताहर) - पाथर्डी तालुक्यातील करंजी गावासह बारा गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊन या योजनेचा प्रश्‍न मार्गी लावणार, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी सभापती संभाजी पालवे यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला दिली.

शिष्टमंडळाला मंत्री पाटील यांनी सांगितले की करोना परिस्थिती दूर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने तुमच्या मतदार संघातील विकासकामांना वेग येणार आहे. अनेक महत्त्वपूर्ण योजना मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून मार्गी लावल्या जातील.

मतदारांना दिलेला शब्द निश्‍चित पूर्ण केला जाईल. वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्‍न महत्त्वाचा असून त्यासाठी मंत्री तनपुरे देखील माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे या योजनेबाबतीत काळजी करण्याची गरज नाही, असा विश्‍वास पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिला. या वेळी माजी सभापती संभाजी पालवे यांच्यासह युवानेते आदिनाथ डमाळे, सरपंच राजेंद्र पाठक, विलास टेमकर, अशोक टेमकर, तुळशीराम शिंदे, देविदास शिंदे, देवेंद्र गीते, सुखदेव गीते आदी या वेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com