वांबोरीत दोन दुकाने फोडून रोकड लंपास

वांबोरीत दोन दुकाने फोडून रोकड लंपास

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील किराणा व कपड्याचे दुकान फोडून धाडसी चोरी केली. याप्रकरणी वांबोरी पोलीस दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील बापूसाहेब मुथा यांचे कपड्याच्या दुकानचे शटर उचकटून आत प्रवेश करून उचकापाचक करून सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच त्याच परिसरातील व सुरेश मुथा यांचे किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे सहा हजार रुपये रोकडीसह व चिल्लर घेऊन पोबारा केला. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला असून दोन चोरटे चोरी करताना दिसून आले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

याप्रकरणी वांबोरी पोलीस दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड हे करीत आहेत.

अहमदनगर येथून आलेल्या ठसेतज्ज्ञांनी परिसराची तपासणी करून ठसे मिळविले असून तपासात हे ठसे महत्त्वाचे असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले.

वांबोरी गावाच्या मध्यवस्तीत व मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन मोठ्या दुकानांना चोरट्यांनी लक्ष केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.