अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वाळकी (ता. नगर) येथील लोखंडे कुटुंबाला खंडणीची मागणी करत नाथा ठकाराम लोखंडे (वय 49) यांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील संशयित सराईत गुन्हेगार विश्वजीत कासार याचा हस्तक अशोक उर्फ सोनू गुंड (वय 29 रा. वाळकी) याला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. तो तीन महिन्यांपासून पसार होता.
वाळकी गावात कासार मळा परिसरात 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत मयत नाथा ठकाराम लोखंडे यांचा मुलगा अनुराज नाथा लोखंडे (वय 22) याने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून इंद्रजित रमेश कासार व शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग, विश्वजीत रमेश कासार व अशोक उर्फ सोनू गुंड (सर्व रा. वाळकी) यांच्या विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील इंद्रजित रमेश कासार व शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग या दोघांना ताब्यात घेतले होते. तर विश्वजित कासार व अशोक उर्फ सोनू गुंड हे पसार होते. पसार गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार आहे, अशी माहिती नगर तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती. उपनिरीक्षक युवराज चव्हाण, अंमलदार सुभाष थोरात, कमलेश पाथरूट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने गुंड याला ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. गुंड हा मोक्का गुन्ह्यातील मुख्य पसार सराईत गुन्हेगार विश्वजीत कासार याचा मुख्य हस्तक असून त्याच्यावर यापूर्वी देखील खंडणी मागणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.