वाकडीत 22 वर्ष महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

मयत महिलेला 5 दिवसाचे मूल || परिसरात हळहळ
वाकडीत 22 वर्ष महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील वाकडी येथील श्री खडेराय देवस्थानच्या नजीकच असणार्‍या जाधव वस्ती येथील गट नंबर 510 मधील विठ्ठलराव आबाजी जाधव यांच्या विहिरीत 22 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर मृतदेह हा येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकाच्या सुन सुजाता उर्फ डल्ली प्रकाश सुनार (नेपाळ) असे नाव असल्याचे समजते आहे.

प्रकाश सुनार (मुसीकोट नगरपालिका, ता. जि. रुकुम नेपाळ) हा येथीलच हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतो. येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षक म्हणून प्रकाशचे वडील काम बघतात. प्रकाशची पत्नी व वडील हे वाकडी येथील देवस्थानच्या रूममध्ये राहतात. येथील रहिवाशी विठ्ठलराव जाधव यांच्या वस्तीलगतच स्वमालकीची विहीर आहे. दि. 14 नोव्हेंबर रात्री 2 च्या सुमारास अचानक आरडाओरड सुरु झाली. आजुबाजुचे स्थानिक नागरिक जमा झाले. तेव्हा विहिरीच्या कडेला चप्पल आढळून आली. सकाळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. गोरे, श्री. बढे, कॉ. संतोष कराळे, अशोक पवार हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक राजेंद्र शेळके, प्रमोद शेळके, दिंगबर आढाव, बाबासाहेब आहेर, विजय जाधव, नितीन जाधव, अविनाश जाधव यांच्या व स्थानिक युवकांच्या मदतीने सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर गळाच्या साह्याने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात यश आले.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सुजाताने 5 दिवसापूर्वीच एका नवजात बालकाला जन्म दिला आहे. एक मुलगी, पती, सासरे असा परीवार आहे. दि. 13 रोजी तिला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले होते. रात्री 2 च्या सुमारास मृत सुजाता ही देवस्थानच्या बाथरुमकडे गेली असता ती परत आली नाही म्हणून तिची नणंद व सासरे हे बघण्याकरिता गेले असता विहिरीच्या जवळ चप्पल आढळून आली, असे नातेवाईकांनी सांगितले. परंतु ही घटना कशी घडली याबाबत चर्चेला मात्र उधाण आले आहे. हा प्रकार नेमका काय हे पुढील तपासात निष्पन्न होईल. पुढील तपास पो. नि. श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड. कॉ. अशोक आडांगळे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com