
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे मूल्यांकन भरण्याची ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या जमिनीचे मूल्यांकन माफ करावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेली स्वतःच्या मालकीची जागा वाकडी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे.
ग्रामपंचायतीने साठवण तलावाकरीता शेती महामंडळाची गट नंबर 216 मधील 4 हेक्टर 88 आर जागा मिळण्याबाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे. ही जागा वाकडी ग्रामपंचायतीला साठवण तलावाला देण्यासाठी शेती महामंडळाने तयारी दर्शविली असून या क्षेत्राची शेती महामंडळाने चालू बाजारभावाप्रमाणे येणार्या मूल्यांकनाची शेती महामंडळाने मागणी केलेली आहे.
त्या अनुषंगाने वाकडी गाव हे प्रभावक्षेत्रात असून बाजार मूल्य तक्त्यानुसार मूल्यांकन 1 कोटी 87 लाख 38 हजार रुपये एवढे निश्चित होत आहे. परंतु वाकडी ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नसल्यामुळे मूल्यांकनाप्रमाणे रक्कम भरू शकत नाही. मागील अनेक वर्षापासून वाकडी गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. सदरच्या जागेचे मूल्यांकन माफ करून वाकडी गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.