धरणांच्या पाणलोटाला पावसाची प्रतिक्षा !

पंधरा दिवसांपासून पावसाची हुलकावणी, लाभक्षेत्रात पावसाची स्थिती भक्कम
धरणांच्या पाणलोटाला पावसाची प्रतिक्षा !

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

यंदा नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत काल पर्यंत कमीच आहे. तर गोदावरी कालव्यांच्या पाणलोटात मात्र समाधानकारक हजेरी लावली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही दमदार हजेरी लावली होती. त्यानंतरही पावसाने काही काळ सातत्य ठेवले. गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस थंडावला आहे. त्यामुळे सह्याद्रिच्या घाटमाथ्यावरील गंगापूर, दारणा तसेच नगर जिल्ह्यातील भंडारदरा या धरणांतील पाण्याची आवक जर बघितली तर मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत घाटमाथ्यावर असणारी ही धरणे जवळपास 70 ते 80 टक्के दरम्यान जाणे आवश्यक होते. परंतु आजच्या तारखेला तसे दिसून येत नाही.

दारणाच्या भिंतीजवळ कालपर्यंत 368 मिमी पाऊस 1 जून पासून पडला. तर याच तारखेला मागिल वर्षी 638 मिमी पाऊस नोंदला होता. गंगापूरला 650 मिमी पावसाची कालपर्यंत नोंद झाली. तर मागील वर्षी या तारखेला 738 मिमी पावसाची नोंद झाली होती. भावलीला काल एकूण 1316 मिमी नोंद झाली. तर मागील वर्षी या तारखेला 1791 मिमी पावसाची नोंद झाली होती. असे सर्वच धरणांच्या पाणलोटातील पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिले आहे.

साधारणत: जून आणि जुलै या महिन्यांत जास्त पाऊस होत असतो, परंतु यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस आतापर्यंत कमी आहे. ही परिस्थिती थोड्या फार फरकाने पुढेही राहिली तर पुढे जायकवाडीला पाणी भविष्यात सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या या धरणांच्या साठ्यांची जर आज समाधानकारक स्थिती असती तर पुढच्या कालखंडात धरणांतील ओव्हरफ्लोचे पाणी जायकवाडीला जाऊ शकले असते.

परंतु धरणसाठ्यांची स्थिती समाधानकारक नसल्याने येणार्‍या पावसाच्या आवके मधून धरण साठे व ओव्हरफ्लो या दोन्हींचा समन्वय कशा पध्दतीने होईल, यावरच येत्या वर्षाचे पाण्या संदर्भातील भविष्य आवलंबून राहील.कालच्या आकडेवारीनुसार जायकवाडी जलाशयात मृतसह एकूण साठा 57.82 टिएमसी इतका आहे. म्हणजेच 56.29 टक्के तर उपयुक्तसाठा 31.75 टिएमसी आहे.

41.42 टक्के इतका आहे. गोदावरीत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 807 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हे चित्र नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या मुक्त पाणलोटातील आहे. धरणांच्या पाणलोटातील पाऊस अजून शिल्लक आहेत. मुसळधार पावसाने धरणे भरतील पण अतिरिक्त पाणी गोदावरीतून जायकवाडीत जाईल. परंतु मागील वर्षी गेले इतके जाईल का? हा प्रश्न आहे. जायकवाडीचा जिवंतसाठा 65 टक्के झाला तर उर्ध्व धरणातून पाणी सोडण्याची गरज पडणार नाही.

मागील वर्षी जायकवाडीच पूर्ण क्षमतेने भरून त्यातील पाणी खाली सोडण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी उपयुक्त साठा हंगमाच्या अखेर पर्यंत 28 टीएमसीपर्यंत टिकून होता. धरणांच्या पाणलोटात पावसाची स्थिती चांगली आहे. तीन चार पाऊस चांगले झाले आहेत. असे असले तरी गोदावरी दुथडी तर गोदावरीचे कालवे पूर्ण क्षमतेने वाहावेत याकडे संपूर्ण लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.

धरणांची आजची व मागील वर्षीच्या आजच्या तारखेची आकडेवारी

धरण आजचा साठा मागील वर्षीचा साठा

दारणा 56.65 टक्के 71.35 टक्के

गंगापूर 51.75 टक्के 54.28 टक्के

मुकणे 26.40 टक्के 22.84 टक्के

वालदेवी 32.29 टक्के 55.86 टक्के

कडवा 17.18 टक्के 54.42 टक्के

भावली 70.95 टक्के 79.28 टक्के

गौतमी 20.44 टक्के 37.09 टक्के

आळंदी 00.00 टक्के 28.76 टक्के

नगर नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठे समाधानकारक स्थितीत येवुन पाणी ओव्हरफ्लो होणे आवश्यक आहे. जेणे करुन मेंढेगिरीच्या अहवालानुसार जायकवाडीचा जिवंतसाठा 65 टक्के होणे इतपत परिस्थिती निर्माण होवु शकेल, अन्यथा अशी परिस्थिती निर्माण न झाल्यास उर्ध्व धरणातुन भविष्यात पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकरता येत नाही.

- उत्तमराव निर्मळ (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, नाशिक)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com