वाघुंडे, आपधूप, पळवेतील एमआयडीसीचे शिक्के हटणार

उद्योगमंत्री उदय सावंत यांची आ. लंके, शेतकर्‍यांना ग्वाही
वाघुंडे, आपधूप, पळवेतील एमआयडीसीचे शिक्के हटणार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

वाघुंडे, आपधूप, पळव्याच्या सातबारावरील एमआयडीसीचे शिक्के हटविणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आ. नीलेश लंके यांच्यासह शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींना दिली.

सुपा येथे उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या वाघुंडे बुद्रुक, आपधूप व पळवे खुर्द येथील शेतकर्‍यांच्या सात बारावर एमआयडीसीचे शिक्के आहेत. याबाबत मंत्रालयात आमदार नीलेश लंके यांच्यासह शेतकर्‍यांचे प्रतिनिधी वाघुुंडे बुद्रुकचे उपसरपंच दत्ता दिवटे, किरण रासकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन शिक्के दूर करण्याची मागणी केली होती. सामंत यांनी पुढील महिन्यात बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही यावेळी दिली.

सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाच्यावतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1061 च्या तरतुदींनुसार एकूण 934.34 हेक्टर आर क्षेत्र अधिसुचित करण्यात येऊन संबंधित शेतकर्‍यांच्या सातबारावर तसे शेरे मारण्यात आले होते. वाघुंडे बुद्रुक 282.4 हेक्टर, पळवे खुर्द 251.56, अपधूप 151.93, म्हसणे 25.23, सुलतानपूर 6.73, बाबुर्डी 216.49 या गावांचा त्यात समावेश होता. बाबुर्डी येथील जमीन धारकांचा भूसंपादनास तीव्र विरोध झाल्याने तेथील भूसंपादनाची कार्यवाही अद्यापही प्रलंबित आहे. त्यापैकी 580.64 हेक्टर आर क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झालेला आहे.

औद्योगिक महामंडळाच्या नाशिक येथील प्रादेशिक अधिकार्‍यांनी 73.76 हेक्टर आर क्षेत्र भूधारकांच्या मागणीप्रमाणे विना अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. याबाबत निर्णय झाल्यानंतरही शेतकर्‍यांच्या जमिनींवरील अधिसूचित करण्यात आलेले शिक्के हटविण्यात आले नसून इतर हक्कामध्ये हा शेरा असल्याने शेतकर्‍यांना त्याचा त्रास होत आहे. आ. लंके यांच्याकडे शेतकर्‍यांनी आपली कैफीयत मांडल्यानंतर त्यांनी शेतकरी प्रतिनिधींसह उद्योग मंत्री सावंत यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत सावंत यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

शेतकर्‍यांना अडचणी

शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर हे शिक्के असल्याने त्यांना कोणत्याही शासकिय योजनांचा लाभ घेता येत नाही, वित्तीय संस्थांचे कर्ज, मिळकत हस्तांतरण, उद्योग व्यवसायास बाधा येत असल्याने हे शिक्के हटवावेत, अशी आग्रही मागणी आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com