अहमदनगर (प्रतिनिधी) -

लष्कराच्या अखत्यारीतील सर्वात जुनी व मोठी तसेच अत्यंत महत्त्वाची आणि नगरचे भूषण असलेली वाहन संशोधन व विकास संस्था (व्हीआरडीई) परराज्यात

स्थलांतरीत होऊ देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी मोठा लढा उभारू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. यासदंर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून यातून ते मार्ग काढतील असे आश्वासन त्यांनी व्हीआरडीईच्या कर्मचार्यांना दिले.

व्हीआरडीई स्थलांतराचा मुद्दा पुढे आल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी व्हीआरडीई मध्ये जावून तेथील कायम आणि कंत्राटी कर्मचारी व त्यावर अवलंबून असलेल्या अस्थापनेतील कर्मचारी यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर माहिती घेत या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली.

व्हीआरडीई नगरबाहेर स्थलांतर होऊ नये यासाठी यासंबंधीत अधिकार्यांसह तात्काळ माजी संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट घेणार आहे. पवार यांच्याशी या विषयावर प्राथमिक बोलणेही झाले असून केंद्र सरकारकडे देखील याविषयी पाठपुरावा करण्यात येईल. वेळप्रसंगी मोठा लढा उभारू पण व्हीआरडीई स्थलांतरित होऊ देणार नाही, असा विश्वास आ. जगताप यांनी कर्मचार्यांना दिला. व्हीआरडीई हे नगरचे वैभव असून ते येथेच राहिल, ते कुठेही जाणार नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

नगर येथील व्हीआरडीई कायमस्वरूपी नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने खा. शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. दुर्गेश गाडेकर, एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी. करोसिया यांनी खा. शिंदे यांना सविस्तर माहिती दिली.

खा. शिंदे यांनी व्हीआरडीई संदर्भात माहिती घेतल्यानंतर स्थलांतराबाबत केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करुन हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करु. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती करू. खा. संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करु, असे आश्वासन दिले. स्थलांतराचा हा प्रश्न नगरचा नसून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही. या संदर्भात लवकरच दिल्ली येथे सर्वपातळ्यांवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा.श्रीकांत शिंदे यांनी दिले.

खा. संजय राऊतांसोबत बैठक

शिष्टमंडळ शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांना बुधवारी (दि.13) रोजी प्रत्यक्ष भेटणार आहे. खा. श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळ आणि खा. राऊत यांचे बोलणे करून दिले. शिष्टमंडळ व राऊत यांच्या बैठकीत परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर पुढे कोणते पाऊल पडणार याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

व्हीआरडीईने नगरचे नाव देशात पोहचविले आहे. नगरचा लौकिक असणारी ही संस्था नगरमध्येच राहिल यासाठी खा. शरद पवार यांच्यामार्फत संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रसंगी लढा उभारू पण संस्था नगरबाहेर स्थलांतर होऊ देणार नाही.

- आमदार संग्राम जगताप