नवतरूण कारभार्‍यांची कारभारणीसाठी मतदार नोंदणीसाठी पळापळ

वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत नोंदणीला ग्रहण ; बूथ लेव्हल अधिकारीच गायब
नवतरूण कारभार्‍यांची कारभारणीसाठी मतदार नोंदणीसाठी पळापळ

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीचा डंका वाजणार असल्याचा मथळा दै. सार्वमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर साखरझोपेत असलेल्या ग्रामस्थांसह नेत्यांचीही तारांबळ उडाली. काही ग्रामस्थ निवडणुकीबाबत अनभिज्ञ होतेे. त्यांनाही निवडणुकीचा समाचार समजला. त्यामुळे केवळ एकाच दिवसात गाव निवडणूकमय झाले. पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने त्यातच तरुणाईचा दांडगा उत्साह ओसंडून वाहू लागला. पहिलेच मतदान, पहिलीच निवडणूक असल्याने अनेकांनी मतदारयादीचा शोध घेतला. तर काही नवविवाहित तरुण कारभार्‍यांनी आपल्या नवीन कारभारणीच्या मतदार यादीत नावनोंदणीसाठी हातात कागदाचे भेंडोळे घेत ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली.

दरम्यान, नावनोंदणीसाठी अद्यापही बूथ लेव्हल ऑफिसरच (मतदार नोंदणी अधिकारी) गायब झाल्याचे आढळून आल्याने अनेकजणांची तारांबळ उडाली. सप्टेेंबरपासून गावच्या नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी जबाबदार अधिकारीच नसल्याने तालुका प्रशासनाचेही पितळ उघड्यावर पडले. त्यामुळे वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदार नोंदणीचा घोळ आणि प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे वाघाचा आखाडा निवडणुकीत ‘नकटीच्या लग्नाला..सतरा विघ्ने’ अशी अवस्था झाल्याने आता नवमतदार गोंधळून गेले आहेत. निवडणूक गावच्या उंबरठ्यावर आली असतानाच अद्यापही आपण या पहिल्या निवडणुकीत आपल्या नवीन कारभारणीसह मतदानापासून वंचित राहतो की काय? अशी धास्ती तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या नवविवाहितांना बसली आहे.

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे. नाव दुरुस्ती, पत्यातील बदल करणे, नवीन विवाह झालेल्या महिलेचे नाव समाविष्ट करणे, 18 वर्षे पूर्ण झालेल्यांचे मतदार यादीत नाव समाविष्ट, मयत मतदार नावे कमी करणे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, आदी प्रशासकीय सोपस्कार रखडले आहेत. हे सोपस्कार कोण पूर्ण करणार? असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. शासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण माध्यमात केले जाते. या कामी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली जाते.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबरपासून मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करणे, नावात आणि दुरुस्ती करणे, मयतांची नावे वगळणे, रंगीत फोटोसहीत यादी करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी बीएलओंची निवड जिल्हा निवडणूक प्रशासनाने केली. मात्र, वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नावनोंदणी करण्यासाठी अद्यापही अधिकारी नियुक्त नसल्याने तरुणाईचा गोंधळ झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com