विस्थापित टपरीधारकांच्या प्रश्नासाठी भेदभाव विसरून एकत्र या

कोळपेवाडी येथे जाण्याची वेळ आली तरी देखील मी जाईल- विवेक कोल्हे
विस्थापित टपरीधारकांच्या प्रश्नासाठी भेदभाव विसरून एकत्र या

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरात विस्थापित टपरीधारकांच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय मंडळींनी भेदभाव सोडून एकत्र यावे यासाठी मला कोळपेवाडी येथे जाण्याची वेळ आली तरी देखील मी जाईल, कारण यात माझं तुझं न करता सर्वसामान्य नागरिकांच्या पोटाच्या अर्थकारणाचा प्रश्न असून हा लवकरच मार्गी लागला पाहिजे, असे प्रतिपादन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले.

शहरातील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने विस्थापितांच्या न्याय हक्कासाठी नुकत्याच झालेल्या अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, व्यापारी नारायण अग्रवाल, विजय आढाव,बबलू वाणी,दीपक वाजे, राजेंद्र सोनवणे,विनोद राक्षे, दिलीप दारुणकर, दीपक गायकवाड, जितेंद्र रनशूर, विवेक सोनवणे, विजय वाजे, मनसे सतीश काकडे, अशोक लकारे, अतुल काले, दत्ता काले, प्रदीप नवले, बाळासाहेब आढाव, सनी वाघ, स्वप्नील निखाडे, दीपक कांबळे, संदीप देवकर, राहुल सूर्यवंशी, सचिन सावंत, ज्ञानेश्वर गोसावी, सिद्धार्थ साठे यांच्यासह शहरातील विस्थापित टपरीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव शहरात 60 टक्के लोक हातावर पोटभरणारे असून ते आपला उदरनिर्वाह भागवत आहे. कोणी तरी रात्रीतून येऊन कोपरगावचे सिंगापूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी गरीब जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे.तसेच शहरात खोका शॉप चा ठराव असताना राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. सर्व भेदभाव सोडून सर्वांनी विस्थापितासाठी एकत्र यावे तसेच पालिकेच्या मोकळ्या जागेवर खोका शॉप व गाळे तयार करून विस्थापितांना द्यावे, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.

यावेळी व्यापारी सुधीर डागा म्हणाले, अण्णाभाऊ साठे पुतळा, बसस्थानक, नवीन व जुनी नगर पालिका, खुले नाट्यगृह, वहाडणे घाट यासह अनेक जागा शहरात असून तेथे गाळे काढून त्या ठिकाणी विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो. यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार्‍या काळे-कोल्हे यांनी अतिक्रमणाचा विषय मार्गी लावावा, याप्रश्नासाठी व्यापारी महासंघ आपल्यासोबत आहे.

कोल्हे साहेब जाऊन 13 दिवसही न होता आपण आमच्या सारख्या गोरगरीब हातावर पोटभरणार्‍या नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्नाला महत्व देऊन आपण एकटे आमच्यासाठी धावून आले. आज खर्‍या अर्थाने कोल्हे साहेब आम्हाला सोडून गेलेले जरी असले तरी तुमच्यात कोल्हे साहेब दिसल्याच्या भावना नागरिकांनी विवेक कोल्हे यांच्याकडे बोलून दाखविल्या.

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण धारकांवर कारवाई केली जाणार नसून ज्यांच्या टपर्‍या काढण्यात आलेल्या आहेत त्यांना पर्यायी जागा ही शासनाच्या नियमानुसार देण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच त्यांचा प्रश्न मार्गी लावू.

- शांताराम गोसावी, मुख्याधिकारी

Related Stories

No stories found.