
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कांद्याच्या दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्यासाठी सातबारा उतार्यावर कांदा नोंदीची सक्ती केली आहे. पण अनेक शेतकर्यांनी अशी नोंद केलेली नसल्याने कांदा विक्री करूनही शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठ्यांनी शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर कांद्याची नोंद करून उतारा द्यावा, अशी मागणी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली.
विवेक कोल्हे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांना सरकारने सानुग्रह अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करून त्याबाबत पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर 200 क्विंटलच्या मर्यादेत 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली होती. याबाबतचा शासन निर्णय जारी केला गेला आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समिती आणि नाफेडकडे कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना कांदा अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या अनुदानासाठी शेतकर्यांना 3 एप्रिलपासून 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे. हे अनुदान केवळ राज्यात कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना तसेच फक्त लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला मिळणार आहे. ज्या शेतकर्यांनी सातबारा उतार्यावर कांदा पिकाची नोंद केली आहे अशाच शेतकर्यांना अनुदान मिळेल, असे शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे ज्या शेतकर्यांनी कांदा पिकाची नोंद केलेली नाही असे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.
बहुसंख्य शेतकर्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे ते पीक पेरणीची ऑनलाईन नोंद करू शकत नाहीत. आताही अनेक शेतकर्यांनी कांदा पिकाची ऑनलाईन नोंद केलेली नाही. बहुतांश तलाठ्यांनी आपल्या कार्यालयात बसून पीक पाहणी केली आहे. कोपरगाव, राहाता, येवला, वैजापूर आदी ठिकाणच्या मोंढ्यात कांदा विक्री केलेल्या बर्याच शेतकर्यांच्या कांदा पिकाची तलाठ्याकडून सातबारा उतार्यावर नोंद करणे राहिले आहे. या शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी तलाठ्यांनी शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर कांदा पिकाची नोंद करून तसे उतारे ताबडतोब द्यावेत, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.