
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तत्कालीन आ. स्नेहलता कोल्हे यांच्या विकासनिधीतील सामाजिक सभागृहासह अपूर्ण कामांचा गेल्या साडेतीन वर्षापासून आपण पाठपुरावा करतो आहोत, मात्र अधिकारी यातुरमातुर तीच तीच उत्तरे देऊन मन समाधान करतात. मात्र जनतेचा संयम सुटला अन त्यात काही बरे वाईट झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिला.
महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोपरगाव शहर व विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी विवेक कोल्हे तहसीलच्या दालनात समस्या निवारण जनता दरबार घेतात त्यात ते सोमवारी बोलत होते. यावेळी तहसिलदार विजय बोरुडे, नायब तहसिलदार पी. डी. पवार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे गाडे, वीज वितरण कंपनी, नगरपालिका आदी प्रशासकीय अधिकार्यांसमोर विवेक कोल्हे यांनी मागील बैठकीत ठरलेल्या व झालेल्या कामांचा आढावा घेतला. या जनता दरबारात कोपरगाव मतदार संघातील प्रलंबीत कामांच्या निवेदनांचा व व्यक्तीगत कामांचा पाऊस पडला.
विवेक कोल्हे म्हणाले, जबाबदार प्रशासकीय अधिकार्यांना प्रश्नांचे गांभीर्य नाही. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील नागरीक छोट्या छोट्या कामासाठी पदरमोड खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी येतात पण अधिकारी पदाधिकारी त्यांना भेटत नाही. अशावेळी सर्वसामान्य जनता आमचेकडे तक्रारी घेऊन येतात. समस्या सुटत नसल्याने ते अपशब्द काढतात. नागरीक जनता संयम ठेऊन आहे. पण त्यांचा संयम सुटला तर त्यातून भलते सलते घडु शकते. तेंव्हा जबाबदार अधिकार्यांनी सार्वजनिकसह व्यक्तीगत प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
राज्यात व जिल्ह्यात आपलेच शासन आहे. पालकमंत्री देखील याच जिल्ह्यातील आहेत, महसुल स्तरावर प्रश्न सुटत नसतील तर मग आम्ही काय समजावे. शेजारच्या मतदारसंघात दुबार, विभक्त नवीन रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळते येथे मात्र दोन-दोन वर्षे वाट पहावी लागत आहे. हे बरोबर नाही, अधिकार्यांनी तंत्रज्ञानाची मर्यादा वाढवुन नागरीक शुल्लक कारणासाठी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे कामामुळे खराब रस्त्यांची व चार्या पोटचार्या क्रॉसींगची कामे तात्काळ सुरू करावी.
शिंगणापूर रस्त्याचे अतिक्रमण काढावे, हनुमानवाडी ते भोजडे रस्ता त्वरीत सुरळीत करावा, घारी गावाला पुर्वीच्या स्वस्त धान्य पुरवरादाराकडून वेळेत शिधा मिळत होता आता त्यात हलगर्जीपणा होतो आहे. धारणगाव येथे गेल्या वर्षभरापासून स्वस्तधान्य दुकान तात्पुरत्या स्वरुपात आहे ते कायमस्वरूपी करावे. माहेगांव देशमुख येथे सर्व्हर उपलब्ध होत नसल्याने स्वस्त धान्य माल घेणार्यांना ताटकळत बसावे लागते. घारी व डाऊच बुद्रुकसाठी स्वतंत्र सजा करावी. गोधेगाव, कोकमठाणसह अन्य गावात गावशिवार बरोबरच रस्त्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबीत आहेत ते मार्गी लावावे, झगडे फाटा ते रांजणगांव देशमुख रस्त्याची चाळणी झाली आहे.
हा रस्ता वाहतुकीस योग्य नाही, त्याचे खड्डे बुजविण्यापेक्षा मजबुतीकरणाचे काम हाती घ्यावे. कारवाडी परिसरातील जिल्हा परिषद अंतर्गत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याचे काम थातूरमातूर करून ग्रामपंचायतीने मंजुर अंदाजपत्रक मागणी केली तर त्याला केराची टोपली दाखली जाते. ठेकेदारांच्या भलावणीसाठी जनतेला वेठीस धरू नका. पंचायत समितीत ठराविक गटाचीच विकास कामे होत आहेत. माहेगाव देशमुख गायगोठ्यांचे प्रकरणे जाणुनबुजुन पूर्ण केली जात नाही असेही विवेक कोल्हे म्हणाले. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, शिवाजी कदम, प्रदीप नवले, सरपंच रविंद्र आगवण, भिमा संवत्सरकर, चंद्रभान रोहोम, एल. डी. पानगव्हाणे, कैलास राहने, गणेश आभाळे, निखिल औताडे, नवनाथ औताडे, गोरक्षनाथ कोकाटे, संतोष सरडे, दिगंबर कोकाटे, शंकरराव फटांगरे, शांताराम मेहरखाब, दीपक हुडे, आदींसह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.