आमची लढाई आमदाराविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द - विवेक कोल्हे

भाजपचा तहसिल कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
आमची लढाई आमदाराविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द - विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

जनसामान्यांच्या छोट्या-छोट्या प्रश्नांसाठी आमचा आक्रोश आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांचा आवाज दाबुन मतदार संघाबाबत वेगळे चित्र रंगवत आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी आम्हाला संघर्षाची शिकवण देवून जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून न्यायाचा मार्ग दाखविला आहे. तेंव्हा आमची लढाई ही आमदाराविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द आहे. याच्यापेक्षाही पाच पट हजारोंच्या संख्येने शेतकरी नागरीक घेवुन थेट मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत धडकु पण शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवुच असा ठाम विश्वास जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.

मतदार संघातील शेतकरी व जनसामान्यांचे प्रश्न गेल्या अडीच वर्षापासून टांगणीला पडले आहेत, विजेसह पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला आहे, बारमाही गोदावरी कालव्याबरोबरच निळवंडे धरण कालव्यांची कामे मार्गी लागावी, शहरवासियांसाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजना मार्गी लागावी, विस्थापीत टपरीधारकांचे तात्काळ पुर्नवसन व्हावे, गोर गरीब निराधार गरजुंना रेशनकार्ड, घरकुल, संजयगांधी निराधार, श्रावण बाळ वृध्दापकाळ यासह विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे.

त्यांच्या मागण्यांचा जनआक्रोश तसेच बससेवा पुर्ववत सुरू करावी, एम आय डी सी साठी जागा संपादित करून ती तात्काळ सुरू करावी यासह असंख्य प्रलंबित मागण्यांचा आवाज महाविकास आघाडी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कचेरी कोपरगाव येथे जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, वीज वितरण कंपनीचे श्री. खराटे आदींना शेतकरी, जनसामान्य नागरिक, पालक, सुशिक्षीत बेरोजगार विस्थापीत टपरीधारक, निळवंडे लाभधारक शेतकर्‍यांसह हजारोंच्या स्वाक्षरीचे निवेदने यावेळी देण्यात आले.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शेतकर्‍यांचा गळा दाबण्यांचे काम हे महाविकास आघाडी शासन करत असुन, फसवा फसवीचा खेळ सुरू आहे. कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री एक हजार कोटीच्या घोषणा करतात. या शासनाची तिजोरी पैशांनी फुल्ल भरलेली आहे मात्र दुसरीकडे आमचा शेतकरी उपाशी आहे. आमच्या छोट्या- छोट्या समस्या सोडविण्यासाठी या सरकारला वेळ नाही, काकडी ग्रामपंचायतीचा साडेपाच कोटीचा थकीत महसुल द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत मात्र एक हजार कोटी आहेत हे अभासी चित्र येथील मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रकार आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, येथील प्रशासन कुणाच्या तरी दडपणाखाली काम करताना दिसत आहे. पण आम्ही प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. अडीच वर्षापासून या मतदार संघातील वंचित शेतकरी जनसामान्य अभासी चित्रातुन बाहेर येवुन स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरून आम्हाला साथ देत आहे. लोकप्रतिनिधी म्हणाले ‘आगे आगे देखो होता है क्या’, झाले काहीच नाही तर शहरातील विस्थापीत टपरीधारक मात्र उठविले, विकासाचे कुठलेच काम झाले नाही. निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजनेला खोडा घालुन आमदारांनी गोदावरी कालव्यांचे एक जादा पाण्यांचे आवर्तनाचे वाटोळे केले त्याचा आम्ही निषेध करतो. यावेळी वीज वितरण कार्यालयाच्या अधिकार्‍यांना विजेच्या खेळखंडोब्याचा निषेध म्हणून कंदील भेट देण्यांत आला. सुत्रसंचलन दिपक चौधरी यांनी करून आभार मानले.

स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. आमचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देवु.

- विवेक कोल्हे

Related Stories

No stories found.