आ. काळेंकडून स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने - विवेक कोल्हे

आ. काळेंकडून स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने - विवेक कोल्हे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यासाठी एक रुपयाचाही निधी न आणता केवळ माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन करून फोटोसेशन करून फोटो सम्राट व खोटे सम्राट अशी नवी ओळख आमदार आशुतोष काळे यांनी केली असल्याची टीका जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली.

नगर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित कार्यक्रमात सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्याला 150 कोटींचा निधी मंजूर केला असून त्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा कोणताही संबंध नसून मी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळे मंजूर केला आहे. त्या कामाशी कोल्हे यांचा काहीही संबंध नाही या आमदार आशुतोष काळे यांच्या वक्तव्यावर विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत आ. काळे यांना जाब विचारला आहे. कोल्हे म्हणाले, पालिकेची निवडणूक आली म्हणून आ.काळे यांची जीभ व पायाखालची वाळू घसरायला लागल्याने ते प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कोल्हे कुटुंंबियाविरूध्द गरळ ओकत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याची जाहीर वाच्यता नगर येथे केली. असे असतानाही सावळीविहीर कोपरगाव रस्त्यासाठी दीडशे कोटींच्या निधीचे श्रेय ते घेत असतील तर हे निंदनीय आहे. मतदार संघातील खराब रस्ते, अतिवृष्टीने झालेली पीक नासाडी, स्मार्टसिटीचे पाप, हजारो सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगारावर फिरविलेला वरवंटा आणि समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यावर केलेल्या स्वाक्षरीचे श्रेयही त्यांनीच घ्यावे. कोपरगावचा पाणीप्रश्न आणि समन्यायी पाणी वाटप कायद्याबाबत शिवसेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठींबा असून सर्वांनी एक होऊन हा प्रश्न धसास लावावा असे ते म्हणाले.

तत्कालीन मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडून विधिमंडळ कामकाजाच्या माध्यमातून पाणी आरक्षण घेत निळवडे-शिर्डी -कोपरगांव बंदिस्त 360 कोटी रुपये खर्चाची पाईपलाईन सौ. कोल्हे यांनी मंजूर करून आणली पण त्याचे सर्व श्रेय कोल्हेंना जाईल या भितीपोटी या योजनेला खोडा घातला. आता आमदार काळे हेच त्याचे अध्यक्ष झाले आहेत. तेव्हा त्यांनीच या योजनेचे भूमिपूजन करून दररोज कोपरगाव शहरवासियांना प्यायला पाणी द्यावे. वाचलेल्या पाण्यातून गोदावरी कालव्यांना शेतीसाठी एक जादा आवर्तन नियोजन करावे. कोपरगाव पालिकेच्या स्थायी समितीत 9 पैकी 7 सदस्य भाजपा सेना मित्रपक्षाचे आहेत. आमदार काळेंनी ज्या रस्त्यांची उदघाटने केली त्याचे ठराव व मंजुर्‍या याच स्थायी समितीने दिल्या.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, भाजपा गटनेते रवि पाठक, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, पराग संधान, जितेंद्र रणशुर, निलेश बो-हाडे, अतुल काले, स्वप्नील निखाडे, सत्येन मुंदडा, कालुआप्पा आव्हाड, अशोक लकारे, संदीप देवकर, विनोद राक्षे, गणेश आढाव, बापू पवार, बबलु वाणी, शिवाजी खांडेकर, दिनेश कांबळे, प्रशांत कडु, रवींद्र रोहमारे, विवेक सोनवणे, दीपक जपे, पप्पू पडीयार, रंजन जाधव आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.