वीज प्रवाह सुरळीत करा अन्यथा जनआंदोलन उभारू - विवेक कोल्हे

विवेक कोल्हे
विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यासह, मतदारसंघातील शेतकर्‍यांचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून

अगोदरच विविध संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी कठोर पावले उचलली तर त्यास राज्य सरकार जबाबदार राहील. त्यामुळे वितरण कंपनीने सदरची मोहीम त्वरीत थांबवून वीजप्रवाह सुरळीत करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह शेतकर्‍यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थीक फटका बसला. लॉकडाउन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची रब्बी पिकांमुळे आर्थीक विवंचना कमी होईल असे वाटत असतानाच महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याच्या सुरू केलेल्या धोरणामुळे ही पिकेही हातची जाऊन मोठा आर्थीक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

वास्तविक राज्य सरकारने सत्तेवर येताच वीज बीलांसह कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचप्रमाणे 100 युनीट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याकडे दुर्लक्ष करून वीज प्रवाह तोडण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचे श्री. कोल्हे म्हणाले. करोना, लॉकडाऊन, नैसर्गिक आपत्ती अशा विविध बाजुने घेरल्या गेलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी गेल्या वर्षीही निराशा आली.

खरिपाची पिके वाया गेल्याने ते उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटले नाही. रब्बीच्या मोसमात विहिरीमध्ये पाणी साठा असताना वीजप्रवाह खंडित करीत असल्याने संकटात आणखी भर पडली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांपुढे आणखी मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटातून शेतकर्‍यांना सावरण्याऐवजी हे सरकार संकटात लोटण्याचे पाप करीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय देण्याच्या भुमिकेतून वीजप्रवाह खंडित करणे थांबवून, वीज प्रवाह सुरळीत करावा,अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा श्री. कोल्हे यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com