जिल्हाधिकार्‍यांकडे उपोषण करावे का ? यांचा संतप्त सवाल...

17 गावांतील मंजूर सभागृह काम
जिल्हाधिकार्‍यांकडे उपोषण करावे का ? यांचा संतप्त सवाल...

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधी तसेच विविध शासकीय योजनेतून दहेगाव बोलका, टाकळी, ब्राम्हणगाव, येसगाव, सुरेगाव, करंजी, रांजणगाव देशमुख, शिरसगाव, वारी, तळेगाव मळे, कोकमठाण, खोपडी, उक्कडगाव, घोयेगाव, शिंगणापूर, शहापूर आणि जेउर पाटोदा या 17 गावांत प्रत्येकी 25 व 10 लाख रुपयांची सामाजिक सभागृहांची कामे मंजूर होऊन चार वर्षे होत आली.

पण प्रत्येक बैठकीत चौकशी करून सांगतो असे एकच साचेबंद उत्तर ऐकायला मिळत आहे. तेव्हा याबाबत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण करावे का, असा संतप्त सवाल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरूडे यांना केला.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालयात जनतेच्या प्रलंबित कामासाठी जनता दरबारचे आयोजन केले जाते. त्यात विवेक कोल्हे बोलत होते. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. गोरगरिबांसाठी केंद्र व राज्य शासन स्वस्त धान्य पुरवठा करते पण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून त्याचे वितरण होत नाही.

हा माल काळ्या बाजारात विकून गोरगरिबांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवल्याच्या प्रचंड तक्रारी पुराव्यानिशी आपल्याकडे आल्या आहेत तेव्हा मतदार संघातील नागरिकांना तात्काळ स्वस्त धान्याचा पुरवठा व्हावा, नविन दुबार रेशनकार्डसाठी स्टेशनरीचे कारण सांगून अडवणूक होते. त्यात संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष घालून समस्येचे निराकारण करावे, असेही ते म्हणाले.

विवेक कोल्हे म्हणाले, जनता दरबारात वचितांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्राधान्य दिले. गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही कोपरगाव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदार संघात समाजाच्या विकासासाठी प्रलंबित असणारे प्रश्न पोटतिडकीने मांडतो. मात्र त्यावर ठोस कार्यवाही होत नसेल तर मग वेगळ्या मार्गाने प्रश्न हाताळावे लागतील.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बंदिस्त नाट्यगृहासाठी जागा आणि निधी मंजूर असतानाही काम का सुरू होत नाही, असा सवाल भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे यांनी केला. अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले, शहरात अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातून रोगराई वाढते आहे, जी रस्त्यांची कामे सुरू आहेत त्याचा दर्जा बेसुमार आहे. विरोधकांच्या कामाला एका रात्रीतून तांत्रिक मान्यता दिली जाते तर दुसरीकडे विकासाचे काम कोल्हे कुटुंबियांनी अडविले म्हणून राजकीय टीका टिप्पणी केली जाते. मग या पाठीमागेही राजकीय हात आहे काय, शहरवासियांच्या समस्यांसाठी मुख्याधिकार्‍यांनी स्वतंत्र वेळ द्यावा, असेही ते म्हणाले.

डाउच बुद्रुक येथील सामाजिक सभागृहासमोर दांडगाईने अतिक्रमण करून दुग्ध व्यवसाय चालविला जात आहे. त्याच्या लेखी तक्रारी करूनही न्याय मिळत नाही, असे बाबा दहे म्हणाले. समृध्दी महामार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले पण कोपरगाव तालुक्यातील 11 गावांतून यासाठी जमीन संपादित करण्यात आली तेथील शेतकर्‍यांचे पाटपाण्याचे व चार्‍याचे तसेच सायपनचे प्रश्न ठेकेदार करत नाही. त्यांच्यावर कुणी राजकीय दबाव टाकला आहे काय. मळेगावथडी जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना कामासाठी मोजणीचा अर्ज देऊनही त्यावर कार्यवाही होत नाही अशी समस्या सरपंच अनिता किरण उगले यांनी मांडली.

शेतकर्‍यांना तसेच विविध ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना पूर्ण दाबाने विजेचा पुरवठा करावा, जी रोहित्र खराब आहेत ती दुरूस्त होऊन मिळावी, काही वीज रोहित्रांचे अपग्रेडेशन करावयाचे ते तातडीने करून द्यावे, बिबटे हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकर्‍यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देता येत नाही तेव्हा दिवसा वीज द्यावी, अशा तक्रारी कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, जनार्दन कदम यांच्यासह उक्कडगांव, मळेगावथडी, चांदगव्हाण, धारणगाव, ब्राम्हणगाव, टाकळी, वारी, रांजणगाव, देशमुख, मनेगाव आदी गावच्या शेतकर्‍यांनी मांडल्या.

ब्राम्हणगाव देवी मंदिराजवळील शौचालय व स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होवून शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्याची विमा कंपन्यांनी तुटपुंजी भरपाई दिली. कासली, हिंगणी, वेळापूर स्मशानभूमीचे काम अपूर्ण आहे. शिंगणापूर आदिवासीसाठी दीड वर्षापासून वीज जोड मिळत नाही. आपत्ती व्यवस्थापन निधीतून सोनारी संरक्षक भिंतीचे काम करावे, रवंदे ते मळेगावथडी. झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख, चांदेकसारे ते कुंभारी यासह विविध गावांतील रस्त्यांचे कामे तात्काळ मार्गी लावावी, घरकुल ड यादी फेर सर्व्हेक्षणात वंचितांना तात्काळ न्याय द्यावा, मनेगाव घरकुल लाभार्थ्यांबाबत बोगस अहवाल देण्यात आला असून त्यात लक्ष घालून वंचितांना न्याय द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, विजय आढाव, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, दिपक चौधरी, कैलास राहणे, दत्तात्रय सावंत, राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी, स्वप्नील निखाडे, संदिप देवकर, भिमा संवत्सरकर, शिंगणापूरचे सरपंच डॉ विजय काळे, करंजीचे सरपंच रवींद्र आगवण, विविध शासकीय, सार्वजनिक बांधकाम तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com