गोरगरिबांच्या संसारावर जेसीबी फिरवून राख रांगोळी करू नका

विवेक कोल्हे यांचे सर्वपक्षीय अतिक्रमणधारकांच्यावतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन
गोरगरिबांच्या संसारावर जेसीबी फिरवून राख रांगोळी करू नका

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गेल्या दोन अडीच वर्षांपासून करोनाच्या महामारीमुळे कोपरगाव शहर बाजारपेठेची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे, निर्बंध शिथील होत आहेत, हातावर प्रपंच असणार्‍या घटकांसमोर त्यांना दररोजच्या जगण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असताना नगरपालिका प्रशासन शहरातील अगोदरच्या विस्थापितांचे पुर्नवसन करत नाही, आता पुन्हा नव्याने अतिक्रमण हटविण्यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने थेट अहमदनगर येथून पोलिसांची कुमक बोलावून गोरगरिबांच्या संसारावर जेसीबी फिरवून त्यांची राख रांगोळी करू नये, अशा आशयाचे निवेदन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सर्वपक्षीय अतिक्रमणधारकांच्यावतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सोमवारी दिले.

याप्रसंगी बाळासाहेब संधान, विजय वाजे, सेनेचे गटनेते योगेश बागुल, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, स्वप्नील निखाडे, मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे, बापूसाहेब काकडे, अकबर लाला शेख, योगेश बागुल, सनी वाघ, शरद खरात, रिपाइंचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, प्रदेश रिपाइंचे शहराध्यक्ष देवराम पगारे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सुकदेव जाधव, कैलास येवले, कहार भोई समाज प्रदेशाध्यक्ष अशोकराव लकारे, शिवाजी खांडेकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष संदीप वाकचौरे, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, व्यवसायिक यांच्यासह टपरीधारक तसेच विस्थापीत टपरीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव पालिका नगररचनाचे अधिकारी श्री. बडगुजर यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विवेक कोल्हे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव शहरातील अतिक्रमण धारकांच्या विरोधात कुणा एकाच्या सांगण्यावरून सुडबुध्दीतून कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही. करोना महामारीमुळे अगोदरच सर्वांची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली आहे. मार्चमध्ये कोपरगाव बसस्थानक इमारत उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला शहरातील अतिक्रमणधारकावर नाहक हातोडा उगारण्यात आला. त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय प्रमुखांना बोलाविण्यात आले होते. त्यानंतर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची दोन-तीन वेळा बैठक घेऊन यावर सामोपचाराने तोडगा काढून पुर्वीच्या विस्थापीतांचे अगोदर पुनर्वसन करावे त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकावर हातोडा टाकू नये म्हणून विनंती केली होती.

कोपरगाव शहरातील अतिक्रमणधारक त्यांच्या दैनदिन रोजीरोटीसाठी रस्त्यावर माल विकतात मात्र वाहतुकीस कुठेही अडथळा होणार नाही याची ते सतत दक्षता घेत असतात. पण कुणाला खुश करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा पुन्हा अतिक्रमण उठविण्याची कारवाई करू नये. शहरासह मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे. अपघातांसह शहरात अवैध धंद्याचे प्रमाण वाढले आहे.

रात्री अपरात्री चोर्‍या, दरोडे, खून मारामार्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर नेमकेपणाने पोलीस प्रशासन व संबंधीत कार्यान्वयीन यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असताना पालिका प्रशासन अतिक्रमण उठविण्यासाठी थेट अहमदनगर येथून पोलीस बळ मागावून सुड बुध्दीची कारवाई करत आहे हे बरोबर नाही. तेव्हा पालिका प्रशासनाने अतिक्रमण उठविण्याची मोहीम तात्काळ स्थगित करावी अन्यथा येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे विवेक कोल्हे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com