15 ऑक्टोबरला येवला टोलनाका बंद पाडू - रोहोम

15 ऑक्टोबरला येवला टोलनाका बंद पाडू - रोहोम

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नगर मनमाड प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 8 ची पावसामुळे दुरवस्था झाली असून त्यावर मोठमोठे खड्डे पडून अपघातात अनेक निरपराध व्यक्तींचे बळी जात आहेत. शासन व या मार्गाची देखभाल दुरुस्ती करणारे नागपूरचे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बघ्याची भूमिका घेत आहे. तेव्हा हे खड्डे तातडीने न बुजविल्यास 15 ऑक्टाबरला येवला टोलनाका बंद पाडू, असा इशारा कोपरगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला. मुदतीत रस्ता दुरूस्त न झाल्यास मृत पावणार्‍या व्यक्तींची जबाबदारी संबंधित कंपनीवर ठेवून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवू, असे विश्वासराव महाले म्हणाले.

विश्वासराव महाले, संचालक प्रदीप नवले, भास्करराव भिंगारे, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, सुनील देवकर, सचिन दत्तात्रय कोल्हे, नाटेगावचे सरपंच विकास मोरे, संदीप देवकर, डॉ. गोरख मोरे, सुभाष शिंदे, बापू सुराळकर, बाळासाहेब चांदर, बाळासाहेब महाले, येसगावचे सरपंच पुंडलिक गांगुर्डे, दिनेश कोल्हे, वसंतराव बोळीज, अंबादास लक्ष्मण देवकर, निलेश वराडे, विष्णू बोळीज, सोपानराव शिंदे, निवृत्ती रोहोम, प्रशांत सुराळकर, बाळासाहेब निकोले यांच्यासह येसगाव, टाकळी, खिर्डीगणेश, ओगदी, आंचलगाव, बोलकी, नाटेगाव या पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी, प्रवासी आदींनी नगर मनमाड महामार्गावरील कोपरगाव तालुका हद्दीतील येवला टोलानाका येथील अभियंते शांतिलाल शिंदे यांच्याशी बुधवारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत रस्ता दुरुस्तीचा जाब विचारला.

कोपरगाव तालुका हद्दीतील नगर-मनमाड महामार्गाची पावसामुळे दुरावस्था झाली. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढुन निरपराध व्यक्तींचे बळी मोठ्या प्रमाणात जात आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना त्याचा त्रास होवून अनेकांना पाठदुखी, कंबरदुखीचे आजार जडले आहेत. तर अनेकांचे हाय-पाय मोडुन ते कायमचे जायबंदी झाले आहेत.

साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी याबाबत अनेक वेळा जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली आहे. रस्त्या या टोल वसुलीची जबाबदारी नागपुरच्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. त्यांनाही अनेकवेळा निवेदने दिली पण संबंधीत अधिकारी थातुरमातुर मुरूम टाकुन खड्डे बुजवितात त्यातून अपघातांचे प्रमाण वाढुन असंख्य दुचाकीस्वराचे डोळे कायमचे निकामी झाले आहेत.

विश्वासराव महाले यांनी याबाबतची सर्व वस्तुस्थिती अभियंते शांतीलाल शिंदे यांना सांगितली. प्रवाशांच्या व पंचक्रोशीतील रहिवासीयांच्या तीव्र भावना असून या महामार्गावरील खड्डे पक्क्या खडीने न बुजविल्यास 15 ऑक्टोबर 2021 रोजी येवला टोलनाका बंद पाडू. यातून होणार्‍या नुकसानीची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची राहिल, असा इशारा दिला. संचालक प्रदीप नवले यांनी आभार मानले. ईस्माईल शहा यांनी निवेदन स्विकारले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com