विशाखापट्टणम महामार्गाचे उर्वरीत काम चार आठवड्यात पूर्ण करा

औरंगाबाद खंडपीठाचे याचिकेवर आदेश
विशाखापट्टणम महामार्गाचे उर्वरीत काम चार आठवड्यात पूर्ण करा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातुन जात असलेल्या कल्याण- निर्मल ( विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेवर चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची प्रगती तसेच कामाचे पूर्णत्व यासह चार आठवड्यात उर्वरित काम पूर्ण करण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत.

यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याचिकेत सामाविष्ट रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत म्हणणे सादर न करता अमरापूर - आष्टी या राज्य मार्गाचे म्हणणे सादर केल्याचे याचिकाकर्ते यांचे वकील अ‍ॅड.अनिरुद्ध निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावरून भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या वतीने चार आठवड्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही केली तसेच रखडलेले काम कधी पूर्ण होणार याशिवाय पुढील सुनावणी पर्यंत महामार्गाचे उर्वरित काम पूर्ण करण्या बाबत योग्य पाऊले उचलण्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.डी.धाणुका तसेच न्यायमूर्ती अनिल एल.पानसरे यांनी आदेश दिले आहे .

प्रतिवादी यांना चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र उत्तरात न चुकता दाखल करण्याचे निर्देश दिले असून प्रतिवादी राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 चे आजपर्यंतच्या भागाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत उचललेली पावले आणि त्या भागाचे बांधकाम केव्हा पूर्ण होईल हे उत्तरात प्रतिज्ञापत्रात सूचित केले असुन येथे योग्य ती पावले उचलतील का, शिल्लक कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर आणि पुढील तारखेपूर्वी काम आणि ते उत्तरात प्रतिज्ञापत्रात रेकॉर्डवर ठेवा. असे आदेशात म्हटले आहे. पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग 61 चे पाथर्डी हद्दीमध्ये गेल्या 6 वर्षापासून काम चालू आहे. सध्या सर्वच ठिकाणी काम बंद आहे. रस्त्याचे काम बर्‍याच जागी अर्धवट अवस्थेत आहे. दररोज छोटी मोठी अपघात होऊन आतापर्यंत शेकडो निरपराधांना आपले प्राण गमवावे लागलेले.या रस्त्याच्या कामासाठी सर्वांनीच आंदोलने करून सुद्धा अधिकार्‍यांना काहीच फरक पडला नाही.आमदार-खासदार यांच्या आदेशाला संबंधित अधिकार्यांनी जुमानले नाही.त्यामुळे न्यायालयात दाद मागितली.

- मुकुंद गर्जे ( याचिकाकर्ते)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com