साठवण तलाव, पाणी आरक्षण व निविदेस विरोधकांनी केलेली स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली

साठवण तलाव, पाणी आरक्षण व निविदेस विरोधकांनी केलेली स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे. तसेच 5 नंबर साठवण तलावासाठी वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देखील मिळविली. 5 नंबर साठवण तलावाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. कोल्हे गटाने धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्यांकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका दाखल केली होती.

त्याविरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले व नगरसेवक विरेन बोरावके यांच्या नावे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सोमवारी सुनावणी होऊन दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरून 5 नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण रद्द करावे ही विरोधकांची मागणी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते विरेन बोरावके यांनी दिली आहे.

ना.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून 131.24 कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे. त्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यास आपले पाण्यावर चालणारे राजकारण संपुष्टात येण्याच्या भितीपोटी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत कोल्हे गटाने न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

त्या याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने या याचिका कर्त्यांनी केलेली मागणी फेटाळली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला आडवे येणार्‍या शुक्राचार्यांना न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे. याकामी अ‍ॅड. शाम पाटील, अ‍ॅड. मिलिंद पाटील, अ‍ॅड.व्ही.डी.साळुंके, अ‍ॅडव्होकेट आर.एल. कुटे,अ‍ॅड. ए.बी.काळे व अ‍ॅड. डी.आर.काळे यांनी काम पाहिले.

अथक प्रयत्नाने शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात ना.आशुतोष काळे यांना यश मिळाले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही त्यासाठी विरोधकांनी मनाचा मोठेपणा दाखवून सहकार्य करावे. मात्र आडवे येवून शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप कोल्हेंनी आपल्या माथी मारून घेऊ नये.

- विरेन बोरावके.

Related Stories

No stories found.