
अकोले |प्रतिनिधी| Akole
आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत स्वतंत्र मुलीच्या पैठण आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन झाल्याने सुमारे 150 विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणात मुली आजारी पडल्याने मुली आपल्या गावी गेल्या आहेत तर काही मुली दवाखान्यात उपचार घेत आहेत.
याबाबतचे वृत्त असे, पैठण तालुका अकोले येथील मुलींच्या आश्रमशाळेत दोन दिवसांपूर्वी चारशे मुलींपैकी टप्प्याटप्प्याने दीडशे विद्यार्थिनी थंडी, ताप, उलट्या, जुलाब याने आजारी पडल्याने त्यांना तातडीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतूळ, येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र गुण न आल्याने काही मुलींना लोणी, संगमनेर येथे हलविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची एकच धावपळ उडाली. सर्व मुली शाळेतून आपापल्या घरी आल्या आहेत. पैठण गावातही विविध आजाराने ग्रस्त रुग्ण आढळले असून नेमके कशामुळे मुली आजारी पडल्या याबाबत पालक चिंतेत आहेत. काही मुलींना बरे वाटल्याने त्या आपल्या घरी आल्या आहेत मात्र ऐन परीक्षेच्या काळात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी सात आठ मुलींना ताप थंडी वाजून आल्याने त्यांना औषधोपचारासाठी कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले, त्यानंतर टप्प्यटप्प्याने दीडशे मुलींना त्रास झाल्याने लगेचच औषधे देण्यात आली. पालकांनी आपल्या मुलांना घरी नेल्याने सध्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही, असे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विष्णू नेहे यांनी सांगितले.
पैठण येथील आश्रमशाळेत मुलींना थंडी तापाने त्रास झाला असून मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी तातडीने त्यांना औषधोपचार दिले आहेत.मी स्वतः शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती पाहणी केल्याचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी सांगितले.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समिती याबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे. वेळोवेळी समितीला शाळेला स्त्री अधिक्षीका नसून तातडीने ही रिक्त जागा भरावी असे तत्कालीन प्रकल्प अधिकारी, प्रकल्प समिती यांना कळवूनही दुर्लक्ष होताना दिसत आहे. मात्र वाढदिवसाच्या फटाक्यांच्या व डीजेच्या ध्वनित विद्यार्थ्यांकडे व त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले.नाशिक येथून विद्यार्थिनींना जेवण एका वाहनातून आणले जाते तयार अन्न व किमान पाच तासांनंतर दिले गेल्याने या अन्नातून त्रास होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.