अटी शर्तींचे उल्लंघन करणार्‍या ‘ईस्मार्ट’ वरील कारवाईचा प्रस्ताव थांबविला?

महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराची पाठराखण
अटी शर्तींचे उल्लंघन करणार्‍या ‘ईस्मार्ट’ वरील कारवाईचा प्रस्ताव थांबविला?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात एलईडी पथदिवे बसविणे व देखभाल दुरूस्तीच्या कामाबाबत करारनाम्यामधील अटी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईस्मार्ट एनर्जी सोल्युशन कंपनीवर करण्यात आलेला कारवाईचा प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून थांबविण्यात आला आहे. ठेकेदाराच्या कामाची मुदत संपुष्टात आलेली आहे. बँक गॅरंटीची मुदतही संपलेली आहे. करारानुसार पथदिव्यांच्या वीज बिलात 80 टक्के बचतही झालेली नाही, असे असतानाही महापालिका प्रशासन ठेकेदाराची पाठराखण करत कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

एलईडी पथदिवे बसविण्याचे काम चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्यास दिरंगाई झाल्यास प्रतिदिन एक लाख रुपये दंड आकारण्याची तरतूद करारनाम्यात आहे. अद्यापर्यंत एलईडी बसविण्याचे काम निविदा अटी शर्तीनुसार पूर्ण केलेले नसल्याने व पथदिव्यांच्या वीज वापर देयकामध्ये 80 टक्के बचत निदर्शनास येत नसल्याने दंड का आकारण्यात येऊ नये, अटी शर्तीचा भंग केल्याबाबत करारनाम्यानुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये?, असा सवाल करत सात दिवसांच्या आत खुलासा सादर करावा, असे आदेश महापालिका प्रशासनाने ठेकेदार संस्था ईस्मार्ट एनर्जी सोल्युशन या संस्थेला दिले होते.

जुन्या 35 हजार 105 फिटींग काढण्यात आल्या. त्याची 38 लाख 25 हजार 720 रुपयांची रक्कम ठेकेदाराने अदा करणे आवश्यक आहे. परंतु यातही करारनाम्यातील तरतुदींचे पालन झालेले नाही. पथदिवे चालू-बंद करण्यासाठी टायमर स्वखर्चाने बसविणे आवश्यक असताना अद्यापही चालू-बंद करण्याचे कामकाज मनपाचे कर्मचारीच करत आहेत. अधिक विविध मुद्द्यांवर आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या आदेशानुसार कंपनीला नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. कंपनीकडून याबाबत उशिराने खुलासा सादर करण्यात आला होता. मात्र, खुलासा समाधानकारक नसल्याने विद्युत विभागाकडून तसा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून या प्रस्तावावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

ठेकेदार संस्थेने दिलेल्या बँक गॅरंटीची मुदत संपुष्टात आलेली आहे. तसेच देखभाल दुरूस्तीसाठी नव्याने एक कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करणे अपेक्षित होते. तीही जमा करण्यात आलेली नाही. मनपा अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com