मातुलठाण परिसरातून शासकीय नियमांचे उल्लघंन करून वाळू उपसा

ठेकेदारावर कारवाई करून लिलाव बंद करावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
मातुलठाण परिसरातून शासकीय नियमांचे उल्लघंन करून वाळू उपसा
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील मातुलठाण परिसरातून शासकीय नियमांचे उल्लंघन करुन वाळू उपसा करणार्‍या वाळू लिलाव धारकावर कायदेशिर कारवाई करून लिलाव बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरपीआय, मनसे व भीमशक्ती या सामाजिक संघटनांच्यावीतने श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मातुलठाण येथे 124 ब्रास वाळूच्या स्टॉकचा वाळू लिलाव झालेला आहे. त्याला 10 दिवसाची वाळू उपसण्यासाठी मुदत दिली आहे, असे असताना रोज 70 ते 80 डंपर, हायवा अशा गाड्या वाळू भरुन जात आहेत. लिलावाचे ठिकाण सोडून इतर ठिकाणावरुनही मोठा वाळू उपसा होत आहे. लिलाव करतेवेळी संबंधित ठेकेदाराला शासनाने नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यात पोकलॅन्ड व जेसीबी व अशी मोठीे यंत्र वापरण्यास मनाई केली आहे. ज्या ठिकाणचे वाळूचे लिलाव घेतले आहेत त्याच ठिकाणाहून व ठरल्या एवढीच वाळू उचलण्यात यावी, असे असताना संबंधित वाळू ठेकेदाराने वाळूच्या लिलावाच्या ठिकाणी वाळूचा उपसा करण्यासाठी पोकलँडच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु केेला आहे. वाळू लिलावाचे ठिकाण सोडून इतर ठिकाणाहून वाळूचा उपसा करण्याचे काम चालुू आहे. निव्वळ वाळूच्या लिलावाच्या नावाखाली नदीतून भरमसाठ वाळू उपसा करण्याचा उद्देश वाळू ठेकेदाराचा आहे.

मातुलठाण येथील नदीमधील वाळू उपसा बेकायदेशिरपणे चालू असून शासनाची दिशाभूल करुन महसूल बुडविणार्‍या व नियमांचे उल्लघंन करणार्‍या वाळू ठेकेदारावर व जेसीबी व इतर वाहनांनी बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्‍या चालक व मालकावर कायदेशिर कारवाई करण्यात येऊन सदरील लिलाव त्वरीत बंद करण्यात यावा.

मातुलठाण जवळील पडीक सरकारी जमिनीत महसूल विभागाने 124 ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा करून वाळू साठा लिलाव करून तो उचलणे कामी ठेकेदाराला बारा दिवस एवढा कालावधी दिला. या परिसरातून सहा दिवसांपासून रोज 70 ते 80 मोठे डंपर वाहतूक करतात. राहता, शिर्डी व राहुरी या शासनाचे नियम धाब्यावर बसून लाखो रुपयाची वाळू महसूल अधिकार्‍यांशी संगणमत करून वाहतूक केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा प्रांताधिकारी, तहसीलचे अधिकारी यांना दुरध्वनी करून व्हिडिओ शूटिंग दाखवले. तरीही कारवाई झाली नाही. लिलावाची 124 ब्रास वाळू एका दिवसात उचलली असताना गुंड प्रवृत्तीचे लोक गावकर्‍यांना दडपशाही करत असल्याने कोणी तक्रार द्यायला पुढे येत नाही.

शासकीय नियमांचे उल्लघंन करुन वाळू उपसा करणार्‍या वाळू लिलाव धारकावर कायदेशिर कारवाई करून लिलाव बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे संदीप मगर, मनसेचे बाबा शिंदे यांनी जिल्हाधिकारी, गौण खनिज अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार निवेदन दिलेे आहे.

Related Stories

No stories found.