मंगल कार्यालयावर तहसीलदारांची कारवाई!

50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्याने 10 हजारांचा दंड
मंगल कार्यालयावर तहसीलदारांची कारवाई!

सुपा (वार्ताहर) / supa - पारनेर तालुक्यामध्ये सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये तहसीलदार ज्योती देवरे यांनी निर्बंध कडक केले. मात्र, अनेक नागरिक निर्बध पायदळी तुडवत आहेत. पारनेर येथील गणपती फाटा येथे गौरीनंदन मंगल कार्यालयात लग्नसमारंभाला तीनशेहून अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली.

पारनेर तालुक्यात 21 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली. तसेच लग्न समारंभ व इतर समारंभासाठी पूर्वपरवानगी काढणे गरजेचे आहे. असे असतानाही गणपती फाटा येथे गौरीनंदन मंगल कार्यालयात पूर्वपरवानगी घेऊन लग्न समारंभ करण्यात आला. 50 व्यक्ती लग्नसमारंभात असणे बंधनकारक होते. मात्र, त्या ठिकाणी तीनशेहून अधिक व्यक्ती उपस्थित होते, तसेच अनेकांनी मास्कही लावला नसल्याचे समजल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने या ठिकाणी भेट देत दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. तसेच यापुढे पुन्हा या कार्यालयात पन्नास व्यक्तींपेक्षा जास्त लोक आढळून आल्यास कार्यालयावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तालुक्यातील 21 गावात रुग्णसंख्या वाढ होत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहे. नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. दि. 13 रोजी तालुक्यातील 40 गावांत करोना चाचण्यांचे आयोजन तहसीलदार देवरे यांनी केले आहे. मात्र अनेक भागात या चाचण्यांसाठी लोक पुढे येताना दिसून येत नाही. लोकांची चाचण्या करून घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. तपासणी कॅम्प लावण्यात आलेला आहे.तेथे नागरिकांनी त्वरित आपल्या करोना चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार देवरे यांनी केले.

करोनाचे संकट अजून टळलेले नाही. लग्न समारंभांना होणार्‍या गर्दीतून कोरोना पसरत आहे. त्यामुळे घरातूनच आशीर्वाद द्यायला शिका. दंड करणे हा आमचा हेतू नसून सर्वांनी कोरोना घालवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

- ज्योती देवरे, तहसीलदार

आज पारनेर... 136

आज (मंगळवारी) पारनेर तालुक्यात 136 करोनाबाधित आढळून आले असून त्यातील 56 रुग्ण निघोज गावातील आहे. एकाच दिवसातील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com