करोना नियमांचे उल्लंघन : अहमदनगरमध्ये 56 लाख रूपये दंड वसूल

जिल्हा पोलिसांची कारवाई
करोना नियमांचे उल्लंघन  :  अहमदनगरमध्ये 56 लाख रूपये दंड वसूल

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणार्‍यांविरूद्ध जिल्हा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. 19 फेब्रवारी ते 01 एप्रिल या 42 दिवसांच्या

कालावधीत 26 हजार 896 केसेस करून 56 लाख 32 हजार 200 रूपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे स्वत: कारवाईसाठी मैदानात उतरले आहे. वाढत्या करोनामुळे पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असली तरी नागरिकांकडून निमयांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यामुळे करोना रूग्ण वाढीचा वेग वाढला आहे.

मध्यंतरी आटोक्यात आलेल्या करोना संसर्गाने फेब्रुवारीत पुन्हा डोेके वर काढले. लग्न सोहळा, धार्मिक कार्यक्रम, निवडणूका यामुळे लोकांची सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली. करोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. फेब्रुवारीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणार्‍यांना दंड करण्याचे आदेश काढले. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळून आल्यास दोनशे रूपये असलेल्या दंडात पाचशे रूपयापर्यंत वाढ केली आहे. लग्नसमारंभात मोठ्याप्रमाणत गर्दी होत होती, यामुळे लग्नसमारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणे व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास पाचशे रूपये दंड आकारला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यासही पाचशे रूपये दंड वसूल केला जात आहे. मंगलकार्यालयात 50 पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास संबंधित मंगलकार्यालयाच्या मालकाला 10 हजार रूपये दंड आकारला जात आहे.

रात्री आठनंतर हॉटेल सुरू ठेवण्यास बंदी घातली गेली आहे. तसेच पार्सल सुविधा बंद करण्यात आली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याची बाब पोलीस अधीक्षक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी गुरूवारी रात्री स्वत: हॉटेलवर कारवाई करून हॉटेल मालकासह तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून दंड वसूल केला. करोनाच्या सुरूवातीच्या काळात दंड आकारला जात नव्हता. नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जात होते. परंतू, आता करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये उल्लंघन करणार्‍यांकडून दंड वसूल केला जात आहे. पोलिसांनी 42 दिवसांमध्ये 56 लाख रूपये वसूल केले असून आता कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com