करोना नियमांचे उल्लंघन : नगरमध्ये 33 हजार जणांवर कारवाई

एक कोटीचा दंड वसूल
करोना नियमांचे उल्लंघन :  नगरमध्ये 33 हजार जणांवर कारवाई
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाच्या दुसर्‍या लाटेत रूग्ण संख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करून विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलिसांना दिले आहे.

नगर शहर पोलिसांनी दोन महिन्याच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणार्या 33 हजार 56 जणांवर कारवाई करून तब्बल एक कोटी एक लाख 53 हजार 295 रूपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी ही कारवाई 22 मार्च ते 27 मे दरम्यान केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने 22 मार्चपासून कडक निर्बंध लागू केले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्यासह कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जात आहे.

शहरात दररोज चौकाचौकात नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, विनाकारण बाहेर फिरणे, दुचाकीवर डबलसीट प्रवास करणे, विनामास्क, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, दुकाने उघडी ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. दंडात्मक कारवाई केली जात असताना काही करोना पॉझिटिव्ह व्यक्ती शहरात फिरत असताना प्रशासनाच्या लक्षात आले. यामुळे पोलीस व मनपा पथकाने फिरणार्या चार हजार 800 जणांची करोना चाचणी केली. 17 मेपासून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. तसेच 170 जणांचे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

Related Stories

No stories found.