जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आस्थापना चालकांविरुद्ध कारवाई

कोल्हेवाडी, तळेगाव, नान्नजदुमाला दारु दुकानांवर छापे
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन 
करणार्‍या आस्थापना चालकांविरुद्ध कारवाई

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या जमाव बंदीचे आदेश व आस्थापनासंबधीचे आदेशाचे उल्लंघन करणार्‍या दोन कापड दुकानांसह बेकायदेशिररित्या चालविल्या चार दारु दुकानांवर स्थानिक प्रशासनाने कायदेशिर कारवाई केली आहे.

जमावबंदीचे आदेश, कडक निर्बंधांसह लॉकडाऊन असे असतांना स्थानिक पातळीवर काही दुकानदार बेकायदेशिरपणे दुकाने सुरु ठेवत आहे. तर छुप्या पद्धतीने मालाची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. त्यानुसार तालुक्यातील चिकणी येथे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी अचानक पाहणी दौरा केला.

त्यामध्ये संदीप विष्णु वर्पे यांचे मन मार्केट क्लॉथ स्टोअर्स व बाळासाहेब मुटकुळे यांचे साई शॉपी क्लॉथ स्टोअर्स ही दोन कापडाची दुकाने सुरु असलेली आढळून आली. सदर दोन्ही दुकाने सील करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270 तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तसेच तालुका हद्दीत कोल्हेवाडी, तळेगाव, नान्नजदुमाला या गावांमध्ये चार बेकायदेशिररित्या दारु विक्रेत्यांवर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व कर्मचार्‍यांनी छापा टाकून कारवाई केली आहे. दारु विक्रेत्यांकडून 10 हजार 638 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

करोना काळात मा. जिल्हाधिकारी महोदयांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन आस्थापना चालु ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com