पाच नंबर साठवण तलावासाठी नगराध्यक्ष वहाडणे यांचे दिल्लीपर्यंत प्रयत्न - गायकवाड

पाच नंबर साठवण तलावासाठी नगराध्यक्ष वहाडणे यांचे दिल्लीपर्यंत प्रयत्न - गायकवाड

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पाच नं.साठवण तलाव व्हावा यासाठी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी संजय काळे, नितीन शिंदे यांचेसह 2018 मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीचे श्री. रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर विजयराव वहाडणे यांनी दिल्ली येथे ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोपरगाव शहराची पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी समृद्धीच्या माध्यमातून पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम करण्याची आवश्यकता पटवून दिली. त्यावेळी ना. गडकरी यांनी फोनवर श्री.रेड्डी यांचेशी संपर्क करून पाच नं. साठवण तलावाचे खोदकाम करण्याचे निर्देश दिले असल्याचे विनायक गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,अभियंता वाघ,अभियंता श्रीमती पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या गायत्री कंपनीच्या अधिकार्‍यांसमवेत अनेक मिटिंग झाल्या.जमिनीतून माती-मुरूम-दगडाचे नमुने घेण्यात येऊन गायत्री कंपनीने खोदकाम करून माती मुरूम वाहून न्यायला सुरुवातही केली.

पण कोपरगावच्या दुर्दैवाने राजकिय अडथळे आणले गेल्याने काम मधेच थंडावले-बंद पडले. मात्र त्यानंतर 2019 मध्ये आशुतोषजी काळे आमदार झाले व त्यांनी राज्य शासनातील संबंधांचा वापर करून पाच नं. साठवण तलावाच्या कामाला गती दिली.

नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित सर्व शासकिय विभाग अधिकार्‍यांना सोबत घेऊन पाच नंबर साठवण तलाव कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. आता तर राज्य शासनाने 134.24 कोटी रू.निधीला प्रशासकीय मान्यता दिल्याने, पाच नं. साठवण तलाव व जलवितरण योजना पूर्ण होणार याची खात्री पटलेली आहे. तसा अधिकृत निर्णयच शासनाने घेतला आहे. काही निःस्वार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या परीने यासाठी हातभार लावला हेही मान्य करावे लागेल.

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आमदार यांच्यात समन्वय असेल तर विकासकामे वेगाने होतात याचा अनुभव यानिमित्ताने आला आहे. नगराध्यक्ष वहाडणे यांनी शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आपल्या कार्यकाळातील नगरपरिषदेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत कोपरगाव शहरासाठी असलेले दारणा व निळवंडे या दोनही धरणावरील मंजूर पाणी आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे असा विषय सर्वानुमते मंजूर करून घेतला असल्याचे विनायक गायकवाड यांनी म्टले आहे.

Related Stories

No stories found.