
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी, मालाचे नुकसान टाळण्यासाठी व शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये, याकरिता ‘गाव तेथे गोदाम’ या प्रस्तावित योजनेसाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्य वखार महामंडळ पुणे येथील सरव्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विभागाचे प्रतिनिधी, महसूल विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, वित्त विभाग, अन्न व नागरी पुरवठा, नाबार्डचे प्रतिनिधी, पुण्याचे पणन संचालक, पुण्याचे सहकार आयुक्तालयाचे उपनिबंधक प्रदीप बर्गे, संजोजक अॅड. निलेश हेलोंडे सदस्य असून राज्य वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सदस्य सचिव आहेत.
ही समिती ‘गाव तेथे गोदाम’ या योजनेचा अभ्यास करून तीन महिन्यात शासनास अहवाल देणार आहेत. शेतकर्यांना शेतीप्रक्रिया आणि कृषी विषयक साधनासामुग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करने, गुणवत्तेला प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.