लॉकडाऊन गावांची संख्या घटली

21 गावांत प्रतिबंध : 13 नव्या गावांचा समावेश
लॉकडाऊन गावांची संख्या घटली
लॉकडाऊन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी आणि दहापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणार्‍या गावांत कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने दहा दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने 69 गावांत लॉकडाऊन लावला होता. यातील 61 गावात करोना नियंत्रणात आला असून उर्वरित आठ गावांत रुग्ण कमी झाले. मात्र, ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. यामुळे या आठ गावांसह नव्याने 13 गावांत कोविड लॉकडाऊन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या लॉकडाऊनच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले की, जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे 300 ते 500 आहे. तसेच जिल्ह्यातील करोना बाधित होण्याचे प्रमाण हे तीन ते पाच टक्के आहे. जिल्ह्यात 20 पेक्षा अधिक सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करणे, गावातील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करणे, कोविड नियमानूसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढविणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.

मात्र, असे असतांना दहा पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणार्‍या गावात या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे करोना सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, करोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व 14 ऑक्टोबरला पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी काढले असून या गावात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच या गावाच्या हद्दीतून कृषी माल आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी राहणार आहे.

लॉकडाऊन लावलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बु. (अकोले), टाकळी (कोपरगाव), चांदा (नेवासा), जामगाव, वासुंदे (पारनेर), वेल्हाळे, उंबरी, चंदनापुरी, वडगाव पान, राजापुर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु, जोर्वे (संगमनेर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (श्रीगोंदा), पिंपळगाव माळवी (नगर) या गावांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.