संगमनेर l प्रतिनिधी

नुसता दिखावा करण्यात पटाईत असलेल्या महसूल अधिकार्यांकडून यंदाही राबविण्यात येणार्या महसूल विजय सप्तपदी अभियानात

संगमनेर तालुक्यातील धादवडवाडी ते माळेगाव पठार हा दोन किलो मीटरचा प्रलंबित रस्त्याचा नंबर लागतो की नाही? की यंदाही महसूलचे अधिकारी ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकार्यांच्या मनमानीमुळे महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातच न्यायाच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहे.

संगमनेर तालुक्यातील धादवडवाडी ते माळेगाव पठार हा दोन किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मंजूर झाला होता. मात्र सात वर्षात मजूर मिळाले नाही म्हणून अद्यापही हा रस्ता प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधी अथवा शासनाकडून रस्त्याप्रश्नी ठोस कार्यवाही व्हावी या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा विधानसभा व लोकसभेला अकोले तालुक्यात समाविष्ठ करण्यात आलेला आहे. माळेगाव पठार ग्रुप ग्रामपंचायतीत येणार्या धादवडवाडीसाठी जाणारा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मंजूर करण्यात आला. त्यानुसार प्रत्यक्षात काम करण्यासाठी मजूरांना आवाहन करण्यात आले. आलेल्या मजूरांना ओळखपत्र देण्यात आले. पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात झाली. अर्धा रस्ता कसाबसा झाला. कारण मजूरांना मिळत असलेला पगार इतर कामांच्या तुलनेत कमी मिळत असे त्यामुळे मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली. त्यातल्या त्यात शासनाकडून येणारे पैसे हे पोस्टात येत असत पंधरा दिवसांनी पैसे मजूरांच्या हातात मिळत तेही अल्प स्वरुपात त्यामुळे रस्त्याच्या कामावर कुणी मजूर येण्यास तयार होईना. अखेर रस्त्याचे काम रखडले अद्यापपर्यंतही रस्ता अर्धवट अवस्थेतच आहे.

धादवडवाडीला जाणार्या रस्त्यासंदर्भात ग्रामसभेत अनेकदा विषय चर्चेेसाठी घेण्यात आला. मात्र मजूरांनी कामावर येण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे रस्त्याच्या कामाला चालना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सारोळेपठार ते धादवडवाडी रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत झाल्याने धादवडवाडीपर्यंत बस येते पण माळेगावपठारला बस जात नाही कारण रस्ताच नाही. धादवडवाडी ते माळेगाव पठार हा रस्ता झाला तर दळणवळणाची गैरसोय दूर होवू शकते. मात्र या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी अथवा महसूल अधिकार्यांनी कायमच दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नुकत्याच झालेल्या अकोले विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत माळेगाव पठार सह धादवडवाडी ग्रामस्थांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना खंबीर साथ दिली. जिल्हा परिषद सदस्याने यासाठी कंबर कसली. मात्र रस्त्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य अद्यापही मनावर घ्यायला तयार नाही. पठारभागातील या रस्त्याचा प्रश्न अकोले विधानसभा व महसूली कामकाज संगमनेर या कचाट्यात सापडला आहे. मात्र दरवर्षी महसूल विभागाकडून रस्त्यांचे अभियान राबविले जाते. अडचणीतील किती रस्ते निर्माण होतात हे मात्र कायमच गुलदस्त्यात राहते. अभियानाला सुरुवात केली हे लगेच प्रसार माध्यमातून दाखविले जाते. मात्र किती प्रलंबित रस्ते होते? किती मार्गी लागले? याचे गणित काही महसूलकडून मांडले जात नाही. मांडले गेले असते तर प्रलंबीत प्रश्नच राहिले नसते. आताही महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. यंदातरी धादवडवाडी ते माळेगाव पठार या रस्त्याचा प्रश्न निकाली लागतो की नाही? हा प्रश्नच आहे. महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातील हा प्रश्न तब्बल सात वर्षापासून प्रलंबीत आहे. वारंवार निवेदने देवून अद्याप प्रश्न सुटलेला नाही. रस्ता काढण्यासाठी महसूल अधिकार्यांनी संबंधीत प्रश्नावर स्थानिक शेतकर्यांशी कधी चर्चा केली नाही. अधिकार्यांची मानसिकता नसल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना समोरे जावे लागत आहे.

धादवडवाडी ते माळेगाव पठार हा रस्ता व्हावा, तो कोणत्याही योजनेतून करावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. अन्यथा ग्रामस्थ आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी अ. नगर, प्रांताधिकारी संगमनेर, जिल्हा परिषद अध्यक्ष अ. नगर, तहसिलदार, संगमनेर यांना देण्यात आले आहे. निवेदनावर मच्छिंद्र भोर, समीर भोर, सुदाम भोर, देवराम मोरे, दत्तात्रय मोरे, विश्वास मोरे, भाऊसाहेब पांडे, मारुती मोरे, रावसाहेब पांडे, मुरलीधर पांडे, सतीष क्षिरसागर, मारुती मोरे, गणेश मोरे, जीवन मोरे, शिवाजी धादवड, दत्तात्रय भोर, रामनाथ मोरे, शांताराम भोर, विलास पांडे, भाऊराव पांडे, गोपीनाथ पांडे आदिंच्या सह्या आहेत.