
भोकर |वार्ताहर| Bhokar
ऐन कडक उन्हाळ्यात पाटबंधारे खात्याची मनमानी व ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे विहीरीने तळ गाठल्याने भोकर येथील नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. नागरीकांना व महिलांना कडक उन्हात भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर जवळच पाटबंधारेच्या चारीत व टेलटँकमध्येपाणी असताना पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करावी लागत असल्याने यात तातडीने वरिष्ठांनी लक्ष घालून भोकर गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे सध्या प्रशासक राज आहे. अनेकांच्या अनुभवानुसार प्रशासकीय काळात नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतात. विनाकरण तक्रारी होत नाही असे असताना ऐन मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात भोकर गावची नळ पाणीपुरवठा योजना पाणी असताना ठप्प झाली आहे. गेल्या आठवड्यापासून नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. येथे प्रशासक असलेले पंचायत समितीचे कृषी अधिकारी अजितानंद पावसे यांच्याकडे भोकरसह दोन गावचे पालकत्व, मुळचा पदभार यामुळे त्यांची चांगलीच दमछाक आहे. कारण उन्हाळा अंतीम टप्प्प्यात आल्याने खरिपाच्या पिकांचे नियोजन करताना त्यांना दोन गावचे प्रशासकीय सरपंच म्हणून कारभार चालवायचा आहे.
येथील गावतळ्यात पाटबंधारे खात्याच्या वितरीका क्रमांक 15 मधून पाणी येते व तेथून येथील माजी उपसरपंच महेश पटारे व सोसायटीचे माजी उपाध्यक्ष संजय पटारे यांचे विहीरीतून जिल्हा परिषद शाळेजवळील पाण्याच्या टाकीत पाणी आल्यानंतर गावची नळपाणी पुरवठा योजना चालते. परंतू कडक उन्हाळ्यामुळे गावतळ्याने तळ गाठला, पर्यायाने पटारे बंधूंची व ग्रामपंचायतीचे विहीर मोकळी झाली अन् गेल्या आठवड्यापासून गावची विहीर ही आटली. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून नळपाणी पुरवठा योजनेद्वारे काही भागात कधी दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड येणारे पाणी बंद झाले. अशीच काहीशी अवस्था मुठेवाडगाव पाझर तलावावरील पाणी पुरवठा योजनेचीही आहे.
गावात अतिशय अल्प प्रमाणात कुपनलीका आहेत. त्यांनी ही तळ गाठला आहे. परंतू गेल्या सहा दिवसांपासून येथून जाणारी पाटबंधारेची वितरिका क्र.15 ही वाहती झालेली आहे. परंतू संबधीत कालवा निरीक्षकांनी पिण्याच्या पाण्याच्या अगोदर शेतीच्या पाण्याला प्राधान्य दिल्याने व पाटबंधारेच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ या नियमाच्या अंमलबजावणीमुळे चारीला पाणी असून ही गावची पाणी पुरवठा योजना ठप्प झालेली आहे. याबाबत संबधीत कालवा निरीक्षकांशी संपर्क साधला असता शेतीला प्राधान्य आहे असे सांगितले जात असले तरी शेतीच्या भरण्या बरोबरच गावतळ्यात पाणी दिले असते तर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबली असती परंतू येथे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी हातबल झाल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे स्वजल अंतर्गत टाकळीभान टेलटँकहुन येणारी पाणी योजनेची काम सुरू करण्याचा आदेश निघून तीन महिने उलटत आलेले असताना ते काम ही धिम्यागतीने सुरू आहे. त्याचबरोबर येथेच 24 तास विज पुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस लाईनचे काम ही धिम्यागतीने सुरू असल्याने पर्यायी तातडीची व्यावस्था म्हणून संबधितांना घाईने या दोनही कामांची पुर्तता केली असती तर कदाचीत आज गावची नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली नसती. येथे ही प्रशासनाची हातबलता दिसत आहे.
एकंदरीत पाटबंधारे खात्याचे कालवा निरीक्षक यांनी या उन्हाळी आवर्तनातील येथील वितरीका सुरू झाल्याबरोबर प्राधान्याने पिण्यासाठी पाणी दिले असते तर अशा प्रकारची भिषण पाणीटंचाई भासली नसती त्याच बरोबर येथील स्वजल योजनेची टेलटँकहुन येणारी पाईपलाईन ही काळजीने व घाईने पुर्ण झाली असती तर कदाचीत या भिषण पाणी टंचाईवर मात झाली असती. परंतू हातबल प्रशासकीय राजमुळे येथे कृत्रीम पाणीटंचाई भासत असल्याने यात वरिष्ठांनी लक्ष घालून गावचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.