
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांची बदली होऊ नये, या आशयाचे निवेदन उपसरपंच गट व टाकळीभान ग्रामस्थांच्यावतीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले. बदली झाल्यास जि. प. येथे शांततेच्या मार्गाने उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सरपंच अर्चना रणनवरे यांनी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांची बदली करण्याबाबतचा अर्ज दिला होता. ग्रामसेवकाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत हा अर्ज दिला गेला असला तरी प्रत्यक्षात मात्र आर. एफ. जाधव हे कर्तबगार व स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याचे स्पष्ट करत उपसरपंच कान्हा खंडागळे गटासह ग्रामस्थांनी बदली न करण्याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे.
टाकळीभान ग्रामस्थांनी आजपावेतो कुठल्याही स्वरूपाची तक्रार अथवा बदलीची मागणी केलेली नाही. टाकळीभानच्या कुरघोडीच्या राजकारणातून ग्रामविकास अधिकारी जाधव यांच्या बदलीची मागणी केली जात आहे. यास टाकळीभान ग्रामस्थांचा विरोध आहे. या कुरघोडीच्या राजकारणातून चांगल्या अधिकार्याचा बळी जाणे उचित ठरणार नाही. श्री. जाधव यांना यापूर्वी दोन वेळेस शासनाचा आदर्श ग्रामसेवक हा पुरस्कार मिळाला आहे. टाकळीभान येथे नव्याने ग्रामविकास अधिकारी येण्यास धजावत नाही. तसेच येथे सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे नवीन अधिकारी व्यवस्थित काम करू शकणार नाही. याचाच परिणाम टाकळीभान गावच्या विकासकामावर होणार असल्याचे उपसरपंच गट व ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
श्री. जाधव यांचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाही. तसेच त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले नसून शासन स्तरावरून कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही. सरपंच टाकळीभान यांनी केवळ नैराश्यातून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. ग्रामविकास अधिकारी जाधव यांची बदली केल्यास उपसरपंच गटासह ग्रामस्थ जि. प. येथे शांततेच्या मार्गाने उपोषण करू, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर उपसरपंच संतोष उर्फ कान्हा खंडागळे, मंजाबापू थोरात, बाबासाहेब बनकर, राजेंद्र कोकणे, राहुल पटारे, भारत भवार, प्रा. जयकर मगर, आबासाहेब रणनवरे, विलास दाभाडे, सुंदर रणनवरे, विनोद रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे, बाबासाहेब तनपुरे, पोपट बनकर, विलास सपकळ, रामभाऊ आरगडे, सुधीर मगर, मोहन रणनवरे, प्रशांत कोकणे, गोरक्षनाथ कोकणे, साईनाथ खंडागळे, प्रशांत नागले, बापूसाहेब शिंदे आदींसह टाकळीभान ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
सरपंच व त्यांच्या गटाने हतबल झाल्यामुळे ग्रामविकास अधिकार्याच्या बदलीची मागणी केली आहे. सरपंचाच्या सहीशिवाय कुठलेही आर्थिक व्यवहार केले अथवा प्रस्ताव पाठविले नाही. मासिक मिटींग, ग्रामसभा घेतल्या नाहीत. जाधव यांच्या कार्यपध्दतीत काही खोट असल्यास त्याचे लेखी पुरावे दिल्यास आम्हीही बदलीची मागणी करू. राजकीय पुढार्यांच्या मनाप्रमाणे कारभार न केल्यामुळे किंवा आर्थिक फायदा न झाल्यामुळे बदलीची मागणी करणे योग्य नाही. राजकीय विरोध आपापल्यात करावा. अधिकार्याला त्रास होईल असे वागू नये. आपण काय करत आहात हे जनतेला कळत नाही, असे समजू नका, असा इशारा उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सरपंच गटाला दिला. ग्रामविकास अधिकार्याची बदली झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. एफ.जाधव एक चांगले व्यक्तीमत्व आहे. अधिकार्याकडून काम करुन घेण्याची सतत्ताधार्यांची क्षमता असावी लागते. मात्र सद्यस्थितीत त्यांची बदली करण्याची मागणी केली जात आहे ती चुकीची आहे. ज्येष्ठ पुढार्यांनी एकत्रीत येऊन बदली प्रकरण नीटपणे हाताळावे व गावाच्या विकासाला बाधा पोहचणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. तसेच गाव विकासासाठी चांगला अधिकारी असणे हेही तितकेच गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे यांनी दिली.