काळे यांच्या निमित्ताने राठोड-गांधी आले एकत्र

काळे यांच्या निमित्ताने राठोड-गांधी आले एकत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू झाल्याची तक्रार शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मध्यंतरी काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर आयटी पार्क प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा आधार घेत शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी काळे यांच्या निमित्ताने नगर शहरात विक्रम राठोड आणि सुवेंद्र गांधी एकत्र आल्याचे दिसून आले.

शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. माजी आमदार स्व. अनिल राठोड हे जसे सामान्यांच्या मदतीला धावून जात होते. सामान्यांवर जर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अत्याचार केला तर, स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून पोलिसांना जाब विचारत होते. त्याप्रमाणे आता शिवसेना नेते काम करतील. ज्यांच्यावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी शिवालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

राज्यात भाजप-शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच नगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना-भाजप एकत्र आल्याने राज्यातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. नगर शहरामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच्यावतीने वारंवार विविध शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर देखील आयटी पार्क पाहणी करण्यासाठी ते गेले असता त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून अशाप्रकारे पोलीस यंत्रणेवर दबाव आणत हे प्रकार राजरोसपणे सुरू आहे, याकडे पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com