‘ते’अंत्यविधी नगर शहरातच करा

विक्रम राठोड यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
‘ते’अंत्यविधी नगर शहरातच करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या काळात कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सर्व अंत्यविधी नगर शहरात करण्याचे चालू ठेवावे, असे निवेदन नगर जिल्हा युवा सेनेचे प्रमुख विक्रम अनिल राठोड यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. याबाबतचा इमेल त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविला आहे.

जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात शहरासह जिल्ह्यात करोनामुळे रुग्ण दगावण्याचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज मृतांचा आकडा 60 ते 65 च्या घरावर जात आहे. या परिस्थितीत करोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांचे अंत्यविधी नगरच्या अमरधाम स्मशान भूमीत करण्यात येतात. यामुळे नगरच्या अमरधाम स्मशान भूमीवर ताण येत असला तरी हे अंत्यविधी नगर शहरातच व्हावेत. जे दगावलेले रुग्ण नगर शहराबाहेरील आहेत त्यांचा अंत्यविधी त्या-त्या गावात करण्याचा विचार करू नये, यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. शहरात जे रुग्ण करोनामुळे मृत्युमुखी पडतात त्यांचा अंत्यविधी नगरच्या अमरधाम स्मशान भूमीत केले जातात. त्यावेळी मनपाचे कर्मचारी तसेच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडणारे सर्व जण या रोगाचा संसर्ग होणार नाही, याची दक्षता बाळगून काम करतात.

पण जर हे अंत्यसंस्कार इतरत्र कोठेही करण्याची परवानगी दिल्यास प्रत्येक ठिकाणी करोना संसर्ग न होण्याबाबत काळजी घेतली जाणार नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून आलेले गोरगरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या करोनाच्या काळात यापैकी मृत झालेले रुग्ण पालिकेने अंत्यसंस्कारासाठी ताब्यात न घेता त्या त्या नातेवाईकांकडे दिले तर ते चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक ठिकाणी असे अंत्यसंस्कार केले गेल्यास त्या त्या गावात अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या लोकांना या रोगाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.

करोना काळात मृतांचे नातेवाईक देखील मृतदेहास हात लावत नाहीत. लांबूनच दर्शन घेतात. तसेच अंत्यसंस्कार करणारे पीपीई किट घालून खबरदारी बाळगतात, अशा स्थितीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हा माणुसकीला धरून नाही . त्यामुळे याचा विचार करावा असे राठोड यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com