भाजप नेत्यांकडून विखेंना परतफेडीचे पहिले इन्स्टॉलमेंट

जिल्हा सहकारी बँक
जिल्हा सहकारी बँक

अहमदनगर : जिल्हा बँकेत गेल्या काही निवडणुकांतील सर्वाधिक एकतर्फी सामना काल समोर आला. दरवेळी बँकेवर वर्चस्व राखणार्‍या थोरात गटाला विखे गटाकडून आव्हान दिले जात असे. यावेळी तसे काही घडले नाही. बँकतील विरोधी गट पहिल्यांदाच एवढा हतबल दिसला.

यास कारण ठरले भाजपातील अंतर्गत राजकारण. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील गटाने आव्हान उभे करण्याचे प्रयत्न केले नाही, असेही नाही. पण त्यांचे गणित अखेरपर्यंत जुळलेच नाही. जिल्ह्यातील सहकाराचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेमध्ये नेते हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येतात, अशी परंपरा आहे. विखे गटाला एकटे पाडून अन्य नेत्यांनी ती परंपरा जपली.

2015च्या पंचवार्षिक निवडणुकीत विखे गटाने जोरदार आव्हान उभे केले होते. यंदा ते जमले नाही. त्यास मुख्यत्वे कारणीभूत ठरली भाजपातील नेत्यांनी केलेली राजकीय परतफेड!

यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणूक काळात विखे भाजपत दाखल झाले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे, आ.मोनिकाताई राजळे, माजी आ.स्नेहलता कोल्हे हे त्यांच्या आधीपासून भाजपचे. शिंदे, कर्डिले जूनेच तर कोल्हे-राजळे 2014 मध्ये दाखल झालेले. 2014 मध्ये बबनराव पाचपुते आणि 2019 मध्ये मधुकरराव पिचडही भाजपमध्ये दाखल झाले. पण ते आपल्याच मतदारसंघातील राजकारणात गुरफटलेले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत विखे यांनी भाजपत आल्यानंतर स्वपक्षीय नेत्यांच्याच पाडापाडीचे राजकारण केले असा आक्षेप घेतला जातो. शिंदे, कोल्हे, कर्डिले यांनी तर थेट राज्यनेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली होती. अर्थात त्याचा फार परिणाम झाला नाही. मात्र पक्षांतर्गत अढी मात्र निर्माण झाली. वरवर विखे व अन्य नेते एकत्र दिसत असले तरी त्यांच्यात जमत नाही, हे लपून राहिलेले नाही.

पक्षनेतृत्व अपेक्षीत निर्णय देत नाही म्हणून काय झाले, थेट मैदानात विकेट घेण्याची संधी असतेच. विखेंनी आमचे राजकीय नुकसान केले, अशी ठाम धारणा असलेला गट परतफेडीसाठी उत्सुक होताच.

अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीने ती संधी दिली.

या निवडणुकीत भाजपतील नेत्यांना एकत्र करून थोरातांसमोर आव्हान उभे करण्याचे प्रयत्न विखेंकडून सुरू होते. यासाठी थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे म्हणून प्रयत्न झाले. भाजपचे पॅनल निवडणुकीत असावे, हा मनसुबा फडणवीस यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न झाला. पक्ष म्हणून त्यांनीही यास थेट नकार देणे टाळले.

मात्र पक्षातील अन्य नेत्यांनी अहमदनगर जिल्हा बँकेच्या राजकारणात पक्षीय राजकारणाला थारा नाही, हे फडणवीस यांच्या कानावर घातले होते. माजी आ.स्नेहलता कोल्हे या तर आक्रमक होत्या. पक्ष म्हणून आम्ही भाजपाचेच आहोत, पण जिल्हा बँकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच नेतृत्वात काम करणार, असे त्या कोणताही आडपडदा न ठेवता नेतृत्वाला सांगत होत्या. अन्य नेत्यांंनीही त्यांच्या या भुमिकेला कोणताही विरोध केला नाही. नंतर अन्य नेत्यांनीही फडणवीस यांना खासगीत काय सांगायचे ते सांगून टाकले.

इकडे माजी आ.कर्डिलेही ‘सहमती’वर जोर देत होते. ना.थोरातांना भेटत होते आणि पुन्हा भेटणार हे जाहिरपणे सांगत होते. यावरून सहकारात वजन असलेले, भाजपतील विखे वगळता अन्य मातब्बर नेते काय करणार, याचा स्पष्ट अंदाज आला होता.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांसमोर विखे समर्थकांनी अर्ज दाखल केल्याने असलेल्या दूराव्यात भर पडली. कर्डिलेंकडे झालेल्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत त्याचा परिणाम उमटला. नंतर विखे समर्थकांनी पक्षातील नेत्यांसमोरील अर्ज मागे घेतले, तरिही भाजपातील ‘या’ नेत्यांनी आपले मत काही बदलले नाही.

बँकेच्या राजकारणात असलेले कर्डिले, कोल्हे, राजळे, पिचड हे नेते विखेंच्या मांडवात जाण्यास तयार नव्हते. आ.बबनराव पाचपुते विखेंसोबत दिसत असले तरी जिल्हा बँकेच्या राजकारणात श्रीगोंद्यातील नागवडे-जगताप एक झाल्याने त्यांच्याही हाती काही नव्हते. सोबत दिसत असलेल्या अन्य ‘छुटभय्यां’चा विखेंना बँकेच्या राजकारणात उपयोग नव्हता.

पिचड, कर्डिले, कोल्हे आणि राजळे या नेत्यांकडे असलेले मतदार एकत्र असते तर थोरातांपुढे निश्चितच आव्हान उभे झाले असते. पण तसे घडले नाही.

हे नेते थोरातांसोबत का गेले?

याबाबत बोलताना एक नेता म्हणाला, ‘आम्हाला थोरातांकडून कसलाही त्रास नाही.’

भाजपमधील नेत्यांना विखेंवर मात करण्याची ही आयतीच संधी होती. त्यांनी आपले वजन थोरात गटाच्या पारड्यात टाकलं आणि विरोधाची हवाच काढून घेतली.

याबाबत भाजपतील नेते खासगीत खूप काही बोलतात. त्यावरून काय तो स्पष्ट अंदाज येतो.

हे येथेच थांबणारे नाही. भाजपचा एक नेता खासगीत अंदाज व्यक्त करताना म्हणतो, ‘राजकीय परतफेडीचा हा पहिला हप्ता आहे. पुढे तर आखणी बरंच काही होणार आहे.’

विखे काही कच्चे खिलाडी नाहीत. ते स्वस्थ बसणारेही नाहीत. स्वत:पुढे आव्हाने उभी करण्यात आणि त्यास सामोरे जाण्यात ते वाक्बगार आहेत. यावेळी फरक एवढाच आहे की सत्तेचं वजन त्यांच्याकडे नाही.

नगरच्या राजकारणाला या कुरघोड्या जीवंतपणा आणतात. पुढील राजकीय कुरघोड्यांचे अंक रंगतदार असतील याबाबत दुमत नसावे!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com