लंकेंच्या फराळात विखेंविरोधी फटाके

राजकारणाला लोकसभा निवडणुकपूर्व फोडणी
लंकेंच्या फराळात विखेंविरोधी फटाके

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

विखेविरोधी राजकीय भुमिका घेणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास विखे विरोधी नेत्यांनी हजेरी लावत राजकीय फटाके फोडल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाला फोडणी देण्यासाठी सज्ज असल्याचा संदेशच या नेत्यांनी दिला आहे.
 

लंके यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमास आ. राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीन कोल्हे या भाजप नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. यावेळी प्रा. शिंदे म्हणाले, आ.लंके यांच्या आगमनाने आमच्या दिवाळी फराळाची सुरूवात झाली. आ. लंके यांच्या फराळाचा शेवट करायला मी आलोय. सुरूवात आपणच करू व शेवटही आपणच करू. मोहटा देवीचे नियोजन पाहून चकीत झालो. आम्हीही निवडणूकीत यात्रेचे नियेाजन केले होते. पण आमच्या गाडीमध्ये प्रचार मात्र दुसर्‍याचा झाला.  

विवेक कोल्हे म्हणाले, समाजातील अहंकारी विचाराचे लोक खाली बसविण्यासाठी लंके यांच्यासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. सर्व उपक्रम प्रेरणादायी असतात. 2024 चा गुलाल त्यांच्यावर उधळला जावा. एकदा नाही तर दोनदा उधळला जावा. यावेळी माजी आ. दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र गुंड, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते.

आम्ही एकत्र आलो तर बर्‍याच लोकांना वाटते हे कसे एकत्र आले? जसे दुसरे एकत्र आले तसेच आम्ही एकत्र आलोय. मी देखील बारीक नाही, माजी पालकमंत्री आहे. कोणी कोणाशी बोलू नये अशी आपल्या राज्याची, जिल्ह्याची संस्कृती नाही. एकमेकांच्या दिवाळी फराळाला गेले पाहिजे. याचा काय अर्थ काढायचा ज्याने त्याने काढावा.

-आ.राम शिंदे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com