संस्कृतीमुळे भारत पुढील 25 वर्षांत विश्वगुरू बनेल - राज्यपाल खान

किशोर बेडकिहाळ यांना विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार प्रदान
संस्कृतीमुळे भारत पुढील 25 वर्षांत विश्वगुरू बनेल - राज्यपाल खान

लोणी |वार्ताहर| Loni

जगामधील अनेक देशात लोक धर्म, रंग, भाषा यांच्या आधारावर एकत्र राहतात. मात्र भारतातील लोक संस्कृती आणि तिच्या आदर्श शिकवणीमुळे समाज म्हणून एकत्र राहतात. याच जोरावर पुढील 25 वर्षांत भारत विश्वगुरू बनेल, असे उद्गार केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी काढले. यावेळी किशोर बेडकिहाळ (सातारा) यांना पद्मश्री विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रवरा आणि विखे पाटील परिवाराच्यावतीने सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 122 व्या जयंती निमित्ताने प्रवरानगर येथे आयोजित साहित्य पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे होते. बुलढाणा अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटीचे चेअरमन राधेश्याम चांडक, सामाजिक कार्यकर्ते शिवराज सिंग, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तानाजीराव धसाळ आदी मान्यवर समारंभाला उपस्थित होते.

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, जेथे साहित्य व कलेचा सन्मान होतो तेथे समाज जिवंत असल्याचे मानले जाते. प्रवरेतील शेतकर्‍यांच्या संस्थेकडून गेल्या 32 वर्षांपासून हे काम केले जात आहे हे कौतुकास्पद आहे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे म्हणाले, साहित्यिक रवींद्र इंगळे यांचा सिंधू घाटी आणि भाषा समजून घेण्याचा प्रयत्न मोलाचा आहे. यासाठीचे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्या काळातील समाज समृद्ध होता. तो नष्ट कसा झाला? भाषा पुढच्या पिढीला आली नाही तर समाज नष्ट होतो. आजही आपण विविध क्षेत्रांत निरक्षर आहोत. आपल्याकडे डोळसपणा नाही. दिसते तेच सत्य हा मानणारा पुढे टिकेल की नाही याबद्दल शंका वाटते. कलावंताला समाज, राजकारण यावर बोलावेच लागते. कलावंतांनी सर्व घटकांसाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी पद्मश्री विखे पाटील यांच्या जीवन-कार्याची माहिती देताना साहित्यिकांच्या योगदानाचे कौतुक केले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रमुख अतिथी आणि साहित्यिक व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात प्रवरा परिवाराने नेहमीच समाजासाठी काम करणार्‍या विविध क्षेत्रांतील लोकांचा सन्मान केल्याचे सांगताना पद्मश्री डॉ. विखे पाटील, लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेतून व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी काम करण्याची बांधिलकी पत्करल्याचे सांगितले.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी 2022 च्या उत्कृष्ट साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. किशोर बेडकिहाळ यांना पद्मश्री डॉ.विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार, रवींद्र इंगळे-चावरेकर यांना डॉ. विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, मंगेश नारायण काळे यांना पद्मश्री डॉ. विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार, के. जी. भालेराव यांना अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार, हिरालाल पगडाल यांना अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार, छबुबाई चव्हाण यांना कलेच्या सेवेबद्दल पद्मश्री डॉ.विखे पाटील कला गौरव पुरस्कार, अभय कांता यांना समाज प्रबोधन पुरस्कार व दत्ता भगत यांना नाट्यसेवा पुरस्कार देऊन प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आताचा महाराष्ट्र निर्भय नाही : बेडकिहाळ

पद्मश्री विखे पाटील जीवन गौरव पुरस्कार मिळालेले साहित्यिक किशोर बेडकिहाळ म्हणाले, पद्मश्री विखे पाटील यांनी बहुजनांना शोषणमुक्त जीवन जगता यावे, भांडवलशाहीपासून संरक्षण मिळावे यासाठी काम केले. समाज निर्भयपणे आणि ताठ मानेने उभा रहावा म्हणून डॉ. धनंजय गाडगीळांसोबत मोलाचे कार्य केले. समग्र जीवनाचा पाया त्यांनी घातला. सहकारातून समृद्धी हे स्वप्न पूर्ण करण्याचा पाया घातला. मात्र आताचा महाराष्ट्र तसा नाही. निर्भय नाही. असा अपेक्षित नव्हता. मात्र सहकाराच्या माध्यमातून तो करता येईल. विखे पुरस्कारामुळे बळ मिळाले आहे. गेल्या 50 वर्षांत असंख्य हातांची मदत झाली. त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारतो. माझी पत्नी आणि मार्गदर्शक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com