
लोणी |वार्ताहर| Loni
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विखे कारखान्याच्या कामगार वसाहतीत परप्रांतीय सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न घरमालक, पोलीस आणि कारखान्याच्या सुरक्षा कर्मचार्यांमुळे फसला. मात्र दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला.
याबाबतची घटना अशी की, विखे कारखान्याच्या कॅनॉल लगतच्या टाईप ए कामगार वसाहतीत कारखान्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश एकनाथ थोरात हे राहतात. बुधवारी मध्यरात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्वयंपाकघराचा दरवाजा वाजल्याचा त्यांना आवाज आला. त्यांनी तातडीने कारखान्याच्या सुरक्षा विभागाला कळवून पोलिसांना पाचारण करण्यास सांगितले. सुरक्षा विभागाने गांभीर्य लक्षात घेत पोलिसांना कळवले.
लोणीचे उपनिरीक्षक योगेश शिंदे व त्यांचे सहकारी लोणी भागात गस्तीवर होते. ते तातडीने प्रवरानगरकडे रवाना झाले. त्याचवेळी आरोपींनी घरात प्रवेश केला. दोघेजण घरात आले व चार जण बाहेर उभे राहिले. लोखंडी कटरचा धाक दाखवून त्यांनी डॉ. थोरात यांची पत्नी सायली यांना धमकावले. त्यांची पर्स ताब्यात घेतली. त्यात दोन हजार रुपयांची रक्कम होती. घरातील इतर ठिकाणी शोध घेण्याच्या आतच पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तेथे पोहचले. बाहेर उभ्या असलेल्या आरोपींनी घरातील दोघांना इशारा केला पण पोलीस आणि सुरक्षा कर्मचार्यांच्या गराड्यातून त्यातील चार जण जवळच्या उसाच्या शेतात पळाले मात्र दोघे जण पोलिसांच्या हाती लागले. यावेळी झालेल्या झटापटीत कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर संतोष जायभाय यांच्या हातावर लोखंडी कटर लागल्याने ते जखमी झाले. पोलीस आणि सुरक्षा कर्मचार्यांनी दोघांना जेरबंद केले.
पकडण्यात आलेले अमरसिंग मिनावा (वय 25) रा. गुराडीया, ता. उकशी जि. धार (मध्य प्रदेश) व रिथुसिंग लालसिंग मिनावा (वय 50 रा) गुराडीया (मध्य प्रदेश) यांच्याकडून लोखंडी कटर, पान्हा, दगड बांधलेला टॉवेल पोलिसांनी हस्तगत केला. शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव, लोणीचे सपोनि समाधान पाटील, राहत्याचे पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांनी घटनास्थळी रात्रीच्यावेळी पोलीस व सुरक्षा कर्मचार्यांच्या मदतीने संपूर्ण उसाच्या शेतात पसार आरोपींचा शोध घेतला मात्र ते मिळू शकले नाहीत. ही दरोडेखोरांची परप्रांतीय मोठी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. थोरात यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.