विखेंच्या आत्मचरित्रात पवारांना बोचकारे !

पुलोद सरकारनंतरच महाराष्ट्राचे राजकारण घातक वळणावर
विखेंच्या आत्मचरित्रात पवारांना बोचकारे !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात फोफावलेल्या घातक राजकाणावरून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात

‘पुलोद’ प्रयोगावर आणि पर्यायाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय भुमिकेवर बोट ठेवले आहे. त्यांनी पवारांच्या क्षमतांबाबत कौतुकाची शब्दमांडणी केली. मात्र सोबतच पवारांचा स्वभाव, वागणं आणि राजकारणाने क्षमतांवर पाणी फिरविल्याचेही म्हटले आहे.

पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे ‘देह वेचावा कारणी’ हे आत्मचरित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मंगळवारी प्रकाशित झाले. तेव्हापासूनच या आत्मचरित्रातील संदर्भांवरून उत्सुकता वाढली आहे.

पद्मभूषण विखे यांचे आयुष्य एकप्रकारे ‘राजकीय कोष’ ठरले. अनेक घटनांचे साक्षीदार आणि सहभागीदार अशी भुमिका त्यांच्या वाट्याला आली. आपल्या राजकीय वाटचालीत अनेक धाडसी निर्णयांनी त्यांनी अनेकदा अचंबित केले तर अनेकांची अडचणही केली. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात नेमकं काय दडलं आहे, याची राज्याला उत्सुकता होती.

अपेक्षेनुसार त्यांनी राजकीय जीवनातील प्रवेश, काँग्रेस, फोरम, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पुलोद, शरद पवार, 1991 ची लोकसभा, शिवसेना आणि भाजप अशा सर्व विषयांचा सविस्तर पदर उलगडला आहे. सद्य राजकारणात महत्त्वाची भुमिका असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा काही राजकीय प्रसंगामध्ये त्यांनी खुबीने आणि सूचक वापर केला आहे.

पवार यांच्या पुलोद सरकारचा उल्लेख करताना त्यांच्या राजकीय स्वभावावरही भाष्य केले आहे. आत्मचरित्रात ते म्हणतात, ‘पवारांनी ‘पुलोद’चा प्रयोग करून मुख्यमंत्रीपद मिळवलं खरं. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने सर्वार्थानं घातक वळण घेतलं. पक्षापेक्षा व्यक्तीगत राजकीय बळ आणि महत्त्वाकांक्षेला महत्त्व आलं.

सत्तेसाठी व सत्तेपुरतं राजकारण करण्याची नवीन परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. ‘सत्तेसाठी सर्व काही’ हा नवा मंत्र महाराष्ट्राच्या राजकारणात रूजला. शत्रू आणि मित्र बदलत राहीले. परंपरागत विरोधी पक्षांऐवजी मूळच्या काँग्रेसी नेत्यांच्या गटांमध्येच संघर्षाचं, स्पर्धेचं राजकारण वाढीला लागलं. खरं तर शरदरावांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची अतिशय चांगली समज आहे. मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्याविषयी चांगलं मत होतं.

जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. राज्याच्या कानाकोपर्‍यातील कार्यकर्त्यांशी त्यांचे असणारे व्यक्तीगत संबंध ही त्यांची मोठी ताकद! राज्याच्या राजकारणाला, समाजकारणाला विधायक वळण देवून विकासकामांची गती वाढवण्याची त्यांची क्षमता होती आणि आहे. तशी संधीही त्यांना मिळत गेली. परंतु त्यांच्यातील राजकारण्यानं, त्यांच्या स्वभावानं व वागण्यानं या सगळ्यावर मात केली.’

आपल्याविरोधात दिल्लीतील नेत्यांचे कान भरणार्‍यांचा उल्लेख त्यांनी ‘पॉवर ब्रोकर’ असा केला आहे. कॉँग्रेस फोरमनंतर पसरलेल्या गैरसमजावरही भाष्य केले आहे. पक्षातील मरगळ दूर करण्यासाठीच हा फोरम होता. मात्र याबाबत राजीव गांधी यांचे कान भरले गेले. पुढे सोनिया गांधींचाही गैरसमज करून दिला, असे उल्लेख त्यांनी केला आहे.

मात्र काँग्रेसमधील काही नेत्यांचा, प्रथांच्या चांगुलपणाचाही संदर्भ त्यांनी दिला आहे. 1991 च्या वादात पी.व्ही.नरसिंहराव व अन्य काँग्रेस नेते लोकसभा निवडणूकीचे तिकीट देण्यास राजी होते, मात्र या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. असा सूचक उल्लेखही त्यांनी केला आहे.

भाजप महाचिवट आहे, असा चिवटपणा काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेला नाही. जिंकायचचं या चिकाटीने भाजपवाले मैदानात उतरतात. प्रसार माध्यमाचं आयुध युक्तीने वापरतात. काँग्रेसला माणसं गोळा करावी लागतात. चुकतं कुठे, याचा शोध घेण्याची काँग्रेसला गरज आहे.

काँग्रेसचा कमकुवतपणा किंवा काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी याबद्दल सखोल विचार करण्याची गरज आहे. आहे त्याच मार्गाने गेल्यास काँग्रेसचं कसं होणार? असा प्रश्नही ते उपस्थित करतात. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या राजकीय घटनांचीही त्यांनी आपल्या शैलीत मांडणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com