गर्दी करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका - नगराध्यक्ष विजय वहाडणे

गर्दी करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका - नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सर्वत्र करोनाने हाहाकार उडालेला असतानाही अनेकजण बेफिकीरपणाने वागून शासकिय नियमे पायदळी तुडवितांना दिसत आहेत.

किराणा व ताजा भाजीपाला घेण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत. काही नागरिकांच्या गलथानपणामुळे सर्व व्यवस्थाच कोलमडून पडू शकते. एका दिवसात 14 बळी गेले म्हणून थोडी जरी लाज शरम शिल्लक असेल तर विनाकारण घराबाहेर पडून, गर्दी करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका, असा संताप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, भाजी, किराणा मिळणार नाही अशा पद्धतीने नागरिक करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी हातभार लावीत आहेत. वाईन शॉप समोर रांगा लागत आहेत. अनेकदा सुचना देऊन, दंड करून, कारवाई करूनही जनता प्रशासनाला सहकार्य करायला तयार नाही. जनतेला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात अधिकारी, कर्मचारी थकून गेले आहेत.

या चुकांमुळेच अमरधाममधे अंत्यसंस्कार करायला जागा शिल्लक नाही, नंबर लागलेत, सरपणाचाही तुटवडा भासू लागला आहे. सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस सेवा करत आहेत. वैद्यकीय सेवा देणारेच आजारी पडताहेत. नगरपरिषदेचे कर्मचारी तरी किती अंत्यविधी करणार? त्यांनाही स्वतःचा जीव परिवार आहे. कोरोना योद्धेच काम करताहेत. निदान त्यांची तरी दया येऊद्या.

खरे तर आता आपण स्थानिक पातळीवर आज आहे त्यापेक्षा कडक नियम लावून संचारबंदी कठोरपणे राबविली पाहिजे. तहसीलदारानी यावर विचार करून बैठक घ्यावी. आम्हाला बैठकीला का बोलाविले नाही? असा प्रश्न विचारणारेही काहीजण आहेत. तरीही करोनाचे नियम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. स्वतःला, कुटुंबाला, कोपरगावला सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.

उपासमारीने बळी जाणार नाही, पण कोरोनामुळे लोक मरताहेत याचा विचार सर्वांनीच करावा. अन्यथा अमरधाममधे अंत्यविधी करायलाही मनुष्यबळ मिळणे कठीण होणार आहे. कुणीही व्यवस्थेला दोष देत बसू नये असा हा भीषण काळ आहे. कोण नाराज होईल याचा विचार करत बसलो तर वेळ निघून गेलेली असेल हे नक्की. राजकारण, वाद करण्याची ही वेळ नाही असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com