करोना रुग्णांची लुटमार करणार्‍यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील- वहाडणे
वहाडणे

करोना रुग्णांची लुटमार करणार्‍यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील- वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील एका मेडिकल स्टोअरने करोना रुग्णाच्या मुलीला 3 रेमडेसिवीर इंजेक्शने प्रत्येकी 22 हजार रुपये घेऊन दिल्याची खात्रीशीर तक्रार माझ्याकडे आलेली आहे.

भांबावून गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी प्रचंड लूट थांबली पाहिजे. यानंतर अशी लुटमारीची तक्रार आली तर संबंधिताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, कोपरगाव शहर, तालुक्यात व सर्वत्रच करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सर्व शासकीय यंत्रणा रात्रंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहे. शासकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर, सफाई कर्मचारी, अनेक संस्था, व्यक्ती अनेक घटक प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे खाजगी हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशनही त्याच कामात आहेत.

मेडिकल स्टोअर करोना बाधितांना प्रामाणिकपणे औषधे, इंजेक्शने उपलब्ध करून देत आहेत. रात्रीअपरात्रीही पुरवठा करत आहेत. पण दुर्दैवाने एका मेडिकल स्टोअरने गंभीर करोना रुग्णाच्या मुलीला 3 रेमडेसिवीर इंजेक्शने प्रत्येकी 22 हजार रुपये घेऊन दिल्याची खात्रीशीर तक्रार माझ्याकडे आलेली आहे. भांबावून गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अशी प्रचंड लूट थांबली पाहिजे.

यानंतर अशी लुटमारीची तक्रार आली तर संबंधिताला गंभीर परिणाम भोगावे लागतील. आज कुणीही गरजू पोलिसांकडे, शासनाकडे तक्रार देत नाही, कारण पुन्हा औषधांची गरज पडू शकते. प्रामाणिकपणे काम करणार्‍या मेडिकल स्टोअर असोसिएशनचा यात काहीच दोष नाही. पण प्रत्येक ठिकाणी नासके कांदे असतातच.गरजुंची लूट थांबविण्यासाठी प्रसंगी नगराध्यक्षपद बाजूला ठेवून काळाबाजार करणार्‍याला धडा शिकवावा लागेल हे संबंधितांनी लक्षात घ्यावे.

वाईटपणा नको म्हणून कुणी बोलत नाही. याचा गैरफायदा कुणीही घेऊ नये. असंतोषाचा भडका उडू शकतो याचे भान ठेवा. सध्या तरी ऑक्सिजन व रेमडिसिवीर इंजेक्शनचे नियंत्रण वितरण ग्रामीण रुग्णालयाच्या निगराणीखाली झाले तर काळाबाजार रोखला जाऊ शकतो. नागरिकांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. खाजगी हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व डॉक्टरांनी एकमेकांना सहकार्य करूनच करोनाला तोंड दिले पाहिजे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com