ज्यांना भ्रष्टाचाराचा वास येतो त्यांना शासनाच्या श्‍वान पथकाचे प्रमुख म्हणून नेमावे : विजय वहाडणे

ज्यांना भ्रष्टाचाराचा वास येतो त्यांना शासनाच्या श्‍वान पथकाचे प्रमुख म्हणून नेमावे : विजय वहाडणे
विजय वहाडणे

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) / Kopargaon - काम व्हायच्या आधी ज्यांना भ्रष्टाचाराचा वास येतो अशांना शासनाने श्‍वान पथकाचे प्रमुख म्हणूनच नेमले पाहिजे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

वहाडणे म्हणाले, शहर विकासाच्या 28 कामांबाबत जनतेत गैरसमज पसरवणारी खोटारडी पत्रकार परिषद कोल्हे गटाने घेतली आहे. या कामांना उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती लवकरच उठेल. कारण न्यायालयासमोर दुसरी बाजू मांडलीच गेलेली नाही. तसेच कोल्हे गट विकासकामे होऊ नये म्हणून या थराला जाईल, असे वाटले नाही म्हणून आम्ही कॅव्हेट दाखल केले नव्हते.

तर जिल्हाधिकारी यांनी 23 मार्चला निर्णय दिल्यानंतर एक महिन्यात कमिशनर यांच्याकडे अपिल करता येते म्हणून आम्ही एक महिन्यानंतर ठेकेदारांना अनामत रक्कम भरण्याचे पत्र देऊन प्रक्रिया पूर्ण केली. दोन महिन्यांत कार्यादेश दिले तरीही आम्ही कार्यादेश द्यायला 4-5 महिने उशीर केल्याचा व मुख्याधिकारी यांनी जाताना घाईघाईत वर्कऑर्डर दिल्याचा भंपक आरोप कोल्हे गटाने केला आहे.

आमचा फक्त 6 ते 7 कामांवरच आक्षेप आहे असे म्हणणार्‍यांनी इतर 22 कामेही का नामंजूर केली? निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत विरोधकांना कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा डाव असून मला ज्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कोणती कामे करायची आहे हे लेखी दिलेले आहे त्या नगरसेवकांच्या प्रभागात कामे मंजूर केलेली आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर मोजमाप करूनच बिले दिली जातात हे माहित असूनही कोल्हे गट वेड्याचे सोंग घेत आहे.

प्रभाग क्र.3 मधील खडीकरण व प्रभाग क्र 5 मधील गटार ही दोनही कामे स्थगित ठेवण्याचे मीच दि. 16 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत सांगितले होते. मात्र 84 लाखांच्या गटारीचे काम आपले मित्र ज्ञानेश्‍वर गोसावी यांना मिळत नाही असे लक्षात आल्यावर हे काम करू नका असे संबंधित नगरसेवक म्हणायला लागले आहेत. तसेच जर मला 25 टक्के मिळत असतील तर माजी आमदारांनी 350 कोटी निधी आणला त्यात त्यांना किती टक्के मिळाले असा सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे गटाला केला आहे.

आपल्या प्रभागातील कामे करून घेण्यासाठी गोड बोलणारे विधानसभेत झालेल्या पराभवामुळे शहर विकासाचे श्रेय मला मिळू नये म्हणून नगरसेवक माझ्या विरोधात बोलत आहेत. सर्वसाधारण सभेत विषय नामंजूर करा तुम्हाला निवडून आणतो या आदेशाचे पालन विरोधी नगरसेवक करत आहेत. सर्व निविदा प्रक्रिया ऑनलाईन असून एस. जी.विद्यालय रस्ता व गुरुद्वारा रोड ही दोन्ही कामे कोणाकडे आहेत? कोल्हे गटाच्या अनेकांना बांधकाम परवानगी पूर्णत्वाचे दाखले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिले आहेत. त्यांनी मुख्याधिकारी यांना किती पैसे दिले ते सांगावे. शहरविकास करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी मला साथ दिली त्यामुळे त्यांच्यावर आरोप होत असून आमच्या कारकिर्दीत सर्वात जास्त विकासकामे झालेली आहेत, असेही वहाडणे म्हणाले.

शहरातील विविध विकास कामे मी मार्गी लावलेली असून, कुठलाही पक्षभेद न करता सर्व नगरसेवकांच्या वॉर्डात देखील कामे झाली आहेत त्याचे आत्मपरीक्षण स्वतः नगरसेवकांनी करावे तसेच ज्यांना नगरपालिकेचा अनुभव नाही त्यांनी संपूर्ण माहिती घेऊनच बोलावे,मी सर्व कामे कायद्याच्या चौकटीत राहून नियमाप्रमाणे केलेली असून नागरिकांच्या जिव्हाळ्याची व आलेली कामे नियमाप्रमाणे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. हे समजण्यास कोपरगावातील नागरिक सक्षम आहेत.

- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com