पठारेसह साथीदारांवर खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा

पोलीस अधीक्षकांचे आदेश : सुडके मळ्यातील चाकू हल्ला प्रकरण
पठारेसह साथीदारांवर खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) - शहरातील व्यवसायिकांवर दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार विजय पठारे व त्याच्या टोळीने बुधवारी एकावर चाकू हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात केवळ किरकोळ मारहाण, शिवीगाळ या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मारहाण जास्त असल्याने व सराईत गुन्हेगाराने चाकूचा वापर केल्याने पठारेसह टोळीविरूद्ध पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश दिल्यानंतर खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा नोंंदविण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी दिनेश मनोहर पंडीत हे त्यांच्या सिध्दार्थनगरमधील सुडके मळ्यात घरासमोर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या विजय राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर), संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारेचा एक मित्र यांनी पंडीत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर विजय पठारे याने त्याच्याकडील चाकूने पंडीत यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केली.

पंडीत हे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतर किरकोळ मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याची माहिती अधीक्षक पाटील यांना मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना खूनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आता तसा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विजय पठारे याच्यासह अन्य साथीदारांना नगर शहरातून याआधी तडीपार केले आहे. त्याने मध्यंतरी बालिकाश्रम रोडवरील दुकानात घुसून तोडफोड केली होती. आता पुन्हा त्याने एकावर चाकू हल्ला केला आहे. त्याच्या साथीदारांना यापूर्वीच्या गुन्ह्यात अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी विजय पठारे याला अटक करण्यात आलेली नाही.

तोफखाना पोलीस पठारेवर मेहरबान

सराईत गुन्हेगार शहरात दहशत निर्माण करीत लोकांवर चाकूने हल्ला करीत असेल तर त्याला तात्काळ अटक करणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांकडून तसे झालेले नाही. त्यात पोलिसांनी त्याच्याविरूद्ध किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याची दखल घेत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा का नोंदविला नाही, या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com