शिर्डी |शहर प्रतिनिधी|Shirdi

संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र देणारे त्याचप्रमाणे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांचा फोटो साई संस्थानच्यावतीने भाविकांना देण्यात

येणार्या व्हीआयपी ऑनलाईन पासेस व देणगी पावतीवर अनेक वर्षांपासून छापण्यात येत असून दर्शनानंतर भाविक सदरील पास रस्त्यावर तसेच इतरत्र ठिकाणी टाकून निघून जातात. यामुळे साईबाबांचे दररोज हजारो पासेस व पावत्या पायदळी तर कधी कचर्यात जमा होत असल्याने देवदेवतांचा अपमान होत आहे.

भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचत आहे. यापुढे साईबाबा संस्थानने साईबाबांचे फोटो सदरील पासेस व देणगी पावतीवर छपाई करू नये, अशी मागणी शिर्डी येथील साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी केली.

साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांचे फोटो दर्शन पासेस तसेच देणगी पावतीवर वरील एका बाजूला छपाई करून लावण्यात आला आहे. शिर्डी शहरात दिवसात कमीत कमी ऑनलाईन दर्शन, व्हीआयपी पासधारक, देणगी देणारे भाविकांची संख्या हजारांहून जास्त आहे. सदरील भाविक दर्शनानंतर आपल्याकडील देणगी पावत्या, तसेच दर्शपासेसची रिसीट रस्त्यावर तसेच हॉटेलच्या रुममध्ये टाकून निघून जातात.

पर्यायाने या सर्व पावत्या कचर्यात जमा होत असल्याने पवित्र साईबाबांच्या फोटोचा अवमान होत आहे. त्यामुळे संबंधित फोटो साईबाबा संस्थानने छपाई करू नये, अशी मागणी साईभक्त विजय कोते, शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल भडांगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कोते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

यावेळी सचिन चौगुले यांनी देखील रस्त्यावर तसेच इतरत्र ठिकाणी साईबाबांचे फोटो नकळतपणे पायदळी येत असल्याने संस्थान प्रशासनाने याविषयी योग्य निर्णय घ्यावा, असे सुतोवाच केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल भडांगे यांनी सांगितले की, याबाबत संस्थानच्या अधिकार्यांशी बोलून विनंती करणार आहे.

व्हीआयपी दर्शन पास, देणगी पावत्यावर असलेल्या साईबाबांचे फोटो अनेकदा भाविकांच्या तसेच वाहनांच्या खाली तुडवले जातात. शिर्डी नगरपंचायतमध्ये आमचे नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नेहमीच भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचणार नाही यासाठी संस्थान प्रशासनाला विनंती करु.
- जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक