साई मंदिराच्या दक्षिणेचा रस्ता खुला करा

अन्यथा दोन दिवसांनंतर ग्रामस्थांचे उपोषण - विजय कोते
साई मंदिराच्या दक्षिणेचा रस्ता खुला करा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने साईमंदिराच्या दक्षिण बाजूस नऊ मीटर रस्त्यावर लावलेले बॅरिकेटींग दोन दिवसांत काढून द्वारकामाई मंदिर तसेच चावडी समोरील मार्ग खुला करावा अन्यथा शिर्डी ग्रामस्थ संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असा इशारा साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते यांनी दिला आहे.

विजय कोते यांनी संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, साईबाबा संस्थानचे शिर्डी नगरपंचायत मालकीच्या नऊ मीटर रस्त्यावर बॅरिकेट लावल्याने ग्रामस्थांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. ग्रामस्थांच्यादृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून या मार्गाने जाताना-येताना साईमंदिराच्या कळसाचे तसेच द्वारकामाई,चावडीचे बाहेरून दर्शन घेता येत होते.

शासनाच्या अटीशर्ती नियमांचे पालन करत नागरिक या रस्त्याने ये- जा करत होते. मात्र संस्थानने या मार्गावर बॅरिकेट लावून हा रस्ताच बंद करून टाकला आहे. यामुळे या मंदिरासह शिर्डीचे ग्रामदैवत असलेले मारुती मंदिरातही दर्शनासाठी जाता येत नाही. सध्या धार्मिकदृष्ट्या पवित्र समजला जाणारा श्रावण महिना सुरू असून या महिन्यात देवदेवतांचे दर्शन होणे महत्त्वाचे असते मात्र साईसंस्थानने ग्रामस्थांचा हक्क जणू हिरावून घेतला आहे.

नाट्यगृहा समोरचा परीसरही येण्याजाण्यासाठी बंद केला हे कितपत योग्य आहे. दरम्यान साईबाबा संस्थानने तातडीने दोन दिवसांत सदरचे बॅरिकेटींग काढून हा रस्ता पूर्ववत खुला केला नाहीतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शिर्डी ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा विजय कोते यांनी दिला आहे.

करोनाचा जंतूसंसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये साईमंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त दर्शनासाठी आतुर झाले आहेत. संस्थानने सोशल डिस्टन्सिंग, मास्क,सॅनिटायझरचा वापर करत टप्प्याटप्प्याने शिर्डी ग्रामस्थांना मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परवानगी द्यावी, नियम व अटीशर्तीच्या अधिन राहून सर्वांना दर्शनाचा लाभ द्यावा, अशी अपेक्षा विजय कोते यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com