विधवा प्रश्नावर अकोल्यात वात्सल्य समिती स्थापन

विधवा प्रश्नावर अकोल्यात वात्सल्य समिती स्थापन

अकोले |प्रतिनिधी| Akole

करोनात विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात वात्सल्य समिती स्थापन करण्याचा शासन आदेश प्रसिद्ध केला. त्यानुसार तहसीलदार सतीश थिटे यांचे अध्यक्षतेखाली अकोल्यात वात्सल्य समितीची पहिली बैठक पार पडली.

करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने अशा समिती असाव्यात म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

तहसीलदार या समितीचे अध्यक्ष असून एकात्मिक बालविकास अधिकारी हे सचिव आहेत. यात अशासकीय सदस्य म्हणून करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते निलेश तळेकर यांना घेण्यात आले आहे.

तहसीलदार सतीश थिटे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर लगेच विधवा महिलांच्या प्रश्नावर आज तातडीने बैठक बोलावली व वात्सल्य समितीमार्फत शासन निर्णयाची परिपूर्ण अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले.

यावेळी अशासकीय सदस्य निलेश तळेकर यांनी सूचना मांडताना मागील काही दिवसात एकल महिला कृती समितीने 471 पेक्षा जास्त कोरोना मध्ये पालकांचा जीव गमावलेल्या पाल्यांना बालकल्याण योजनेच्या माध्यमातून 1100 रू. लाभ मिळवून दिला. तसेच अकोले मध्ये कांचन या पीडित महिलेस लोकवर्गणीतून घर बांधून देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तसेच काही महिलांना उपजीविकेचे साधन म्हणून शिलाई मशीन प्राप्त करून दिल्या.तसेच या कामाची सुरुवात हेरंब कुलकर्णी यांचे माध्यमातून अकोले मधून झाली असून राज्यभर अनेक सेवाभावी संस्था व कार्यकर्ते मदती साठी आले आहेत.अकोल्यात पथदर्शी काम होण्यासाठी समितीचे आणखी 2 सदस्यांना सामावून घेण्याची विनंती केली व ती मान्य झाली.या मुळे अंमलबजावणी अधिक सक्षम होण्यासाठी मदत होईल.

पुढे निलेश तळेकर यांनी प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांचे पथक स्थापन करून विधवा महिलांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेट दिल्यास अधिक परिपूर्ण माहिती मिळवता येईल.तसेच या कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला व इतर कारणाने विधवा झालेल्या महिला असा एकूण रिपोर्ट तयार करण्यात यावा. या माध्यमातून या महिलांना एकूण शासकीय योजनांचा लाभ देणे, विविध सेवाभावी संस्थाचे माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात मदत होईल. या मध्ये एकल महिला पुनर्वसन कृती समिती सर्वांगाने आपणास मदत करील अशी भावना तळेकर यांनी व्यक्त केली.

तहसीलदार थिटे यांनी तालुक्यातील करोनात विधवा झालेल्या महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू व सर्व योजना त्यांना देण्यासाठी नियोजन करू असे सांगितले.

सदस्य सचिव हाके यांनी सर्वांचे स्वागत केले व सर्व विभागांनी सहकार्य केले तर या महिलांचे पुनर्वसन वेगाने होऊ शकेल त्यासाठी सतत पाठपुरावा आपली समिती करेल असे सांगितले.

यावेळी तहसीलदार सतिश थिटे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका आरोग्य अधिकारी पी. एस. मरभळ, तालुका पशुसंवर्धन विभागाचे डॉ. ए. के. धिंदळे, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग राजूर चे गंगाराम करवर, तालुका संरक्षण अधिकारी कनिष्ठ बी. एन. गोर्डे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एच. एम. हाके, संघटना प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.